छत्रपती संभाजीनगर : कामावरून काढून टाकलेल्या टेक्निशियनने घाटी रुग्णालयाच्या एक्स-रे रूममध्ये अनधिकृत प्रवेश केला व तपासणीसाठी आलेल्या २६ वर्षीय तरुणीला चाचणीसाठी कपडे काढायला लावले. त्याने अश्लील स्पर्शही केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. गुरुवारी या प्रकरणी राळ उठल्यानंतर घाटी प्रशासन कामाला लागले. टेक्निशियन शेख मोहम्मद फरहान शेख नदीमोद्दीन (२३, रा. मजनु हील) याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.
बेगमपुऱ्यातील तरुणीला रविवारी छातीत वेदना सुरू झाल्या होत्या. ती आईसोबत सायंकाळी ७:३० वाजता घाटीत गेली. डॉक्टरांनी तिला एक्स-रे काढण्यास सांगितले. ११/ड कक्षातील एक्स-रे रूममध्ये तेव्हा मोहम्मद एकटाच हजर होता. टेक्निशियनच्या वेशभूषेत असल्याने तरुणीलाही संशय आला नाही. त्याने घाटीचा टेक्निशियन असल्याची बतावणी करून चाचणीसाठी पूर्ण कपडे काढावे लागतील, असे सांगितले. तरुणी काही काळ थबकली. मात्र, मोहम्मदने तांत्रिक कारणे सांगून तिला टाॅप वर करायला लावत अश्लीलरीत्या स्पर्श केला.
...मग घाटी प्रशासन फिर्यादीतरुणीने कुटुंबीयांना हा प्रकार सांगितल्यानंतर नातेवाइकांनी घाटीत जात संताप व्यक्त केला. लेखी तक्रारीनंतर अधीक्षक शिवाजी सुक्रे यांनी विभागप्रमुखांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अधीक्षकांच्या आदेशानंतर डॉ. बालाजी गोरे यांनी मोहम्मदविरोधात गुरुवारी बेगमपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच सहायक निरीक्षक शेषराव खटाणे यांनी त्याला अटक केली.
आयकार्डसह घाटीत वावरआरोपी मोहम्मद कोरोना काळात २०१९-२० मध्ये कंत्राटी पद्धतीवर घाटीत टेक्निशियन होता. कंत्राट संपल्यानंतर त्याला काढून टाकण्यात आले. मात्र, तरीही त्याचे विभागात येणे-जाणे होते. गरजेनुसार त्याला अनधिकृतरीत्या कामावरही बोलावले जात होते, असे घाटीतील सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, नोकरी गेल्यानंतरही त्याच्याकडे घाटीचे ओळखपत्र होते. ते घालून तो घाटीत सर्वत्र फिरत होता.
घटना घडली तरी कशी?- डॉ. वर्षा रोठे या संबंधित विभागप्रमुख आहेत. घाटीच्या क्ष-किरण शास्त्र विभाग, क्ष-किरण, सोनोग्राफी, एमआरआय, सिटी स्कॅन विभागात डॉक्टर, तज्ज्ञांचे ड्युटी लावण्याचे काम त्या बघतात. तीन शिफ्टमध्ये हे काम चालते. त्यांनी नेमून दिलेले डॉक्टर, कर्मचारीच तेथे काम करू शकतात.- २५ ऑगस्ट रोजी त्यांनी दुपारी २ ते सायंकाळी ८ दरम्यान दोषी महिला तंत्रज्ञाची ड्युटी लावली होती. मात्र, राेठे यांना कुठलीही कल्पना न देता दोषी महिला तंत्रज्ञ परस्पर गैरहजर राहिल्या.- आदल्या दिवशी त्यांनी रात्रपाळी केली होती. ४ वर्षांपूर्वीच त्या बदलीने घाटीत रुजू झाल्या. त्या सध्या गर्भवती असून, रोज बीडवरून ये-जा करीत असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले.- प्रशासनाने त्यांना निलंबित केले. शिवाय विभागीय चौकशीदेखील लावण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.
या प्रश्नांची घाटी प्रशासन उत्तरे देईल का?- कोलकाताच्या घटनेनंतरही घाटी प्रशासनाने काहीच धडा घेतला नाही का?- महिला, मुलींसाठी आवश्यक महिला तंत्रज्ञ का नाही? पुरुष तंत्रज्ञ असल्यावर महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती का नसते?- घाटीच्या संवेदनशील विभागासह सर्वत्र मोहम्मदचा आयकार्डसह वावर कसा सुरू होता?- घटनेत केवळ महिला तंत्रज्ञावर ठपका ठेवण्यात आला. तिच्या व्यतिरिक्त या घटनेला कोणीच कसे दोषी नाही?
उशिराची जाग; आता हे बदलया घटनेनंतर अधिष्ठाता सुक्रे यांनी गुरुवारी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.- महिला, तरुणी एक्स-रे, सोनोग्राफी, एमआरआयसाठी आल्यास सोबत आत एक चतुर्थश्रेणी महिला कर्मचारी असेल.- क्ष किरण शास्त्र विभागाच्या सर्व चाचणींसाठी नर्स नियुक्त असतील.- विभागात ठरावीक शिफ्टसाठी नियुक्त कर्मचारी, तज्ज्ञ यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश नसेल.- महिला रुग्णासाेबत कुटुंबातील महिला सदस्याला प्रवेश असेल.