औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ३८ अभ्यास मंडळांवरील नियुक्तीसाठी या वर्षी अर्ज मागविण्यात येणार आहेत. या नियुक्त्या पारदर्शक आणि निकषांचे पालन करून व्हाव्यात; तसेच पात्र शिक्षकांचीच यात नियुक्ती करण्यासाठी आग्रही आहे. पात्र, उमेदवारांचीच अभ्यासमंडळावर नियुक्ती करू, असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यामुळे अभ्यासमंडळावर नियुक्तीसाठी फिल्डिंग लावलेल्या प्राध्यापकांना विद्यापीठाच्या अर्ज प्रक्रियेचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत.
विविध नियुक्त्यांवरून राज्यपाल भवनात तक्रारींचा ढीग असल्याने या निवडणुकीत पारदर्शकता आणि नियमांच्या पालनाकडे विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले आहे. विविध अभ्यास मंडळांवरील नियुक्तीबाबत अनेक विषयशिक्षक आग्रही असतात. प्रशासनावर संघटना व राजकीय दबावही आणला जातो. त्यामुळे निकषांची पूर्तता होणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष होते. अशी काही प्रकरणे यापूर्वी विद्यापीठात घडलीही आहेत. मात्र, यावेळी कुलगुरूंनी त्यासाठी अर्ज प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला असून, त्यातून छाननी झाल्यावरच कुलगुरू नियुक्ती करतील. अर्जाचे स्वरूप निश्चित करण्यात येत आहे. स्वरूप निश्चित झाल्यानंतर शिक्षकांना तो अर्ज भरून द्यावा लागेल. त्या अर्जांची छाननी प्रक्रिया होईल व नियुक्ती करण्यात येणाऱ्या शिक्षकांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.
३८ अभ्यास मंडळे, ११४ जणांची नियुक्तीविद्यापीठात चार विद्याशाखांमध्ये १३५ अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत असून ३८ अभ्यास मंडळे आहे. प्रत्येक अभ्यास मंडळात सहाजणांचा समावेश असतो. तिघे निवडून, तर तिघाजणांची नियुक्ती कुलगुरू करतात. ३८ अभ्यास मंडळांवर विद्यापीठाकडून ११४ जणांची नियुक्ती होते. ही अभ्यास मंडळे अभ्यासक्रम निश्चिती, प्रश्नपत्रिका निश्चिती, उत्तरपत्रिका तपासणी, पीएच.डी. पॅनल निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडतात.