छत्रपती संभाजीनगर : महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघे निवडणुकांत कोंबड्यासारखे झुंजतात. आपल्याला वाटते ही खरीच झुंज आहे. पण, ही नौटंकीची झुंज आहे, हे लक्षात घ्यावे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल, तर वंचितच्या उमेदवारास मतदान करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांच्या प्रचारार्थ आमखास मैदानावर शनिवारी रात्री आंबेडकर यांची सभा झाली. यावेळी उमेदवार अफसर खान, जावेद कुरेशी, प्रभाकर बकले, किशन चव्हाण, अमित भुईगळ, सय्यद जफर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महायुती व महाविकास आघाडीचे निवडणुकीत नात्यागोत्याचेच उमेदवार आहेत. हे सर्व श्रीमंत मराठा समाजाचे उमेदवार आहेत. जरांगे पाटलांनी ज्या गरीब मराठ्यासाठी लढा उभारला होता. त्याच्यातला एकही उमेदवार दिलेला नाही. सत्ता मराठा घराणेशाहीच्याच हातामध्ये राहणार आहे. ज्या घराणेशाहीला सत्ता देणार आहात तो शरीराचा एक डावा हात आहे आणि दुसरा उजवा हात आहे. सत्ता डाव्या हाताकडे आली काय किंवा उजव्या हाताकडे आली, ती शरीराकडेच आली म्हणजे कुटुंबाकडे आली, अशी परिस्थिती आहे. मुस्लीम बांधवांना आवाहन आहे की, हिंदू समाजाचा मतदार सेक्युलर विचाराचा आहे. देशात सेक्युलर राजकारण उभे राहिले पाहिजे, यासाठी आपल्या समाजाच्या विरोधात जाऊन त्याने मतदान दिले. त्याची कदर करायला हवी. मुसलमानांना वेगळे पाडण्याचे भाजपचे जे राजकारण आहे, ते यशस्वी करण्याचे काम होता कामा नये.
महाविकास आघाडीसोबत युती करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे आमची मागणी होती की, सेक्युलर मतदाराला आश्वासन द्यावे की, पाच वर्षे तुम्ही भाजपसोबत जाणार नाही. आश्वासन दिले नाही ते दिले नाही. आता निवडणुकीच्या काळात मोदी सांगत सुटले आहेत की, उद्धवसेना आपल्यासोबत आल्याशिवाय राहणार नाही. हे संकेत आहेत उद्याचे. शिवसेना ही सेक्युलर झाली, असे तुम्हाला कसे वाटले हा माझा मुस्लीम बांधवांना प्रश्न आहे, जर आता मुस्लीम समाज चुकला, तर परत ही संधी मिळणार नाही.
एमआयएमने खंजीर खुपसलाआंबेडकर यांनी मुस्लीम समाजाला इशारा दिला की, एका समाजावर निवडणुका जिंकता येत नाहीत. सर्वसमावेशक मतांवरच निवडणुका जिंकता येतात. मागच्या निवडणुकीत वंचितने एमआयएमसोबत युतीमध्ये मुस्लीम उमेदवार दिला होता. विधानसभेत याच एमआयएमने वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला. एकट्या मुस्लीम मतावर एमआयएमचा उमेदवार जिंकून आला नाही, तो इथल्या ओबीसींच्या मतावर जिंकून आला. ओवैसी असेल किंवा इतर कोणी असतील, युती केल्यानंतर युतीचा धर्म निभावावा लागतो, तो निभावता येत नसेल तर युती करू नका, असे ते म्हणाले.