- संजय जाधव पैठण: रब्बी हंगामासाठी मोसमातील पहिले आवर्तन जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी सायंकाळी ४ वा सोडण्यात आले. १०० क्युसेक्स क्षमतेने सुरू करण्यात आलेल्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. रब्बी पिकासाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जायकवाडी धरणात सध्या ४५.५६% जलसाठा असून रब्बी हंगामासाठी शुक्रवारी पहिली पाळी सोडण्यात आली आहे. १०० क्युसेक्सने सुरू केलेल्या विसर्गात हळूहळू वाढ करून २००० क्युसेक्स पर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. सदर रब्बी पाळीचे पाणी २५ दिवस सुरू राहणार आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पुढील दोन पाळ्या बाबत निर्णय घेतला जाणार आहे. रब्बी पाळिचे पाणी परभणी जिल्ह्यातील कालवा साखळी क्र. किमी १२२ पर्यंत जाते. हंगामातील पहिले आवर्तन सोडताना विशेष काळजी घ्यावी लागते. सुरवातीला कमी क्षमतेने पाणी सोडून कालव्याची चाचणी घेतली जाते. शेवटपर्यंत विनासयास पाणी पोहचल्यानंतर विसर्गात हळुहळू वाढ करण्यात येते. दरम्यान कालव्यास कुठे गळती लागलेली असल्यास दुरूस्ती करण्यात येते असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.
जायकवाडीच्या डाव्या कालव्या अंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील १२०००० हे. सिंचन क्षेत्रासाठी जवळपास १७० दलघमी पाणी २५ दिवसात धरणातून सोडण्यात येणार आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, बाजरी, तूर,हरभरा या पिकासह फळबागासाठी कालव्यातून सोडलेले पाणी लाभदायक ठरणार असल्याने जायकवाडी लाभक्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद, जालना, व परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांंना मोठा दिलासा मिळाला आहे.
रब्बी हंगामात तीन तर उन्हाळ्यात पाच आवर्तनेधरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यातून रब्बी हंगामात तिन तर उन्हाळी हंगामात पाच आवर्तने दिले जातात. जलाशयातून एकूण ११४८ दलघमी पाण्याचा वापर केला जातो. परंतु यंदा पिकांची परिस्थिती व उपलब्ध जलसाठ्या नुसार जायकवाडी प्रशासनास पुढील पाणीपाळीचा निर्णय घ्यावा लागणार आहे.
डावा कालव्यावर १४१६४० हे.सिंचनजायकवाडी धरणाच्या २०८ कि मी लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात १४१६४० हे. क्षेत्र सिंचना खाली येते यात छत्रपती संभाजी नगर - ७६२० हे, जालना - ३६५८० हे, परभणी - ९७४४० हेक्टर क्षेत्र येते या क्षेत्रातील पिकांना फायदा होणार आहे.
उजव्या कालव्यातूनही पाणी सोडाउजव्या कालव्यावर ४१६८२ हे क्षेत्र सिंचनाखाली येते. जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि मी लांबीचा आहे. या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यात छत्रपती संभाजी नगर - १४३२ हे, बीड - ३७९६० हे, व अहमदनगर - २२९० हे क्षेत्रातील पिकांसाठी पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.