छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या उपकरातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांपैकी यंदा समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय लाभार्थ्यांना पिठाची गिरणी, विद्यार्थी- विद्यार्थिनींना सायकल वाटप, घरांवर अच्छादनासाठी लोखंडी पत्रे यासह शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजनांना काट लावण्यात आला आहे. दरम्यान, उर्वरित योजनांसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
समाज कल्याण विभागामार्फत उपकरातील २० टक्के रकमेतून अनुसूचित जाती, नवबौद्ध, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, तसेच ५ टक्के निधीतून दिव्यांगासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. मात्र, या आर्थिक वर्षात (सन २०२४-२५) मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थिनींना सायकल वाटप, मागासवर्गीय शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक मोटार संच, ऑइल इंजिन, पीव्हीसी पाइप, व्यवसायासाठी पिठाची गिरणी, घरावर अच्छादनासाठी लोखंडी पत्रे, स्प्रिंकलर संच, वाहनचालक प्रशिक्षण आदी योजना बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या योजनांकडे डोळे लावून बसलेल्या अनेक लाभार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
दरम्यान, यंदा ११९ मागासवर्गीय लाभार्थ्यांना संगणक किंवा लॅपटॉप, ९२ पुरुष व तेवढ्याच महिला लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन, ८६ पशुपालक शेतकऱ्यांना कडबाकुटी यंत्र, शिवणकाम करणाऱ्या ३२२ महिलांना पिकोफॉल मशीन, १२५ जणांना गाय- म्हैस वाटप केली जाणार आहे. याशिवाय, १०० महिला तसेच पुरुषांना मिरची कांडप यंत्र, २०० जणांंना शेळ्यांचे गट अशा सुमारे सव्वाचार कोटींच्या योजना राबविण्यात येणार आहेत. १०० टक्के अनुदानावर राबविण्यात येणाऱ्या या योजनांसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी १५ जुलैपर्यंत पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन जि. प. समाज कल्याण अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत यांनी केले आहे.
दिव्यांगांसाठी कोणत्या योजना?सामाजिक सुरक्षा व कल्याण अंतर्गत ४० टक्के व त्याहून अधिक दिव्यांगासाठी उपकराच्या ५ टक्के निधीतून विनाअट घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. ४१ दिव्यांगांना या घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. शिवाय, निराधार, निराश्रीत किंवा अतितीव्र २५० दिव्यांगांना विनाअट १० हजार रुपयांचा निर्वाह भत्ता तसेच ३५ जणांना स्वयंचलित तीनचाकी सायकल वाटप केली जाणार आहे. गरजू दिव्यांगांनीही १५ जुलैपर्यंत अर्ज करायचा आहे.