औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडत असून, पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. मागील सात दिवसांत ४७ मंडलांत अतिवृष्टी झाली असून, मंगळवारी सकाळपर्यंत १३ मंडलांत ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडविली आहे. खरीप हंगामातील शिल्लक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात १२० मंडलांत एकवेळा, ९५ मंडलांत दोनवेळा आणि ४८ मंडलांत तीनवेळा अतिवृष्टी झाली आहे. १७ मंडलांत चारवेळा, ५ मंडलांत पाचवेळा, ६ मंडलांत सहावेळा अतिवृष्टी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात सातवेळा अतिवृष्टी झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात ८२ नागरिकांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर १ हजार १७१ लहान-मोठी जनावरे पावसाळ्यात दगावली. ९ हजार ९२१ मालमत्तांची पडझड झाली. विभागाच्या ६७९ वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ८८२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२३ टक्के असून, गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत १ हजार १०० मि. मी. पाऊस झाला होता. विभागात यंदाच्या पावसाळ्यात ४५० पैकी २९४ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. विभागातील निम्न दुधना वगळता सर्व ११ प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा होत आहे. ८७५ लघू व मध्यम प्रकल्पांत सध्या ९० टक्के जलसाठा आहे.
१८ ऑक्टोबर रोजी या ठिकाणी अतिवृष्टी१८ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, चापानेर, चिकलठाण, सिल्लोडमधील अंभई, सोयगावमधील बनोटी मंडलात सरासरी ७० मि.मी. पाऊस बरसला. जालना जिल्ह्यातील कुंभारझरी, ग्रामीण, अंबड, सुखापुरी, घनसावंगी मंडळात सरासरी ८० मि.मी.च्या आसपास पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील मादळमोळी, पाचेगाव, चकलांबा मंडलात सरासरी ६८ मि.मी. पाऊस झाला. १७ रोजी १० मंडलांत अतिवृष्टी झाली होती. ७ ऑक्टोबर रोजी १४ मंडलांत त्यानंतर ८ ते १३ ऑक्टोबरदरम्यान १० मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली होती.
रात्रीतून होतो पाऊसऑक्टोबर महिन्यात आजवर १८ दिवसांत दिवसा पावसाचे प्रमाण कमी राहिले असून, रात्री मुसळधार पाऊस होण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यरात्री पाऊस सुरू होऊन पहाटेपर्यंत बरसत असल्याचा अनुभव आहे. पुढील काही दिवस पाऊस पडले, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.