औरंगाबाद : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने खिंडार पाडले आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात आहेत. शिंदेसेना की शिवसेना; यापैकी कुठे जावे, यावरून त्यांची घालमेल सुरू आहे. विद्यमान आमदारांची साथ सोडली तर पोटापाण्याचा प्रश्न आहे. शिवसेनेत राहिलाे तरीही पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी बंडखोर आमदारांचा कळप जवळ केल्याचे सध्या तरी चित्र आहे.
ज्या पदाधिकाऱ्यांना आमदार निधीतील कामांची गरज नाही, ते सध्या शिवसेनेसोबत आहेत. ज्यांची बिले, धोरणात्मक कामे, जमिनीचे व्यवहार साटेलोट्यांनी चालतात, ते मात्र शिंदे गटातील आमदारांसोबत बिनधास्तपणे गेल्याचे दिसते आहे. शहरातील शिवसेनेचे बंडखोर आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल यांनी बुधवारी शक्तिप्रदर्शन केले. शिरसाटांच्या रॅलीत शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात दिसून आले. तर जैस्वालांकडे तुरळक पदाधिकारी, कार्यकर्ते होते. पैठण आ. संदीपान भुमरे यांच्या बाजूने शिवसेनेची तालुक्यातील सगळी फळी गेली आहे. पश्चिम मतदारसंघातील एक माजी महापौर आ. शिरसाट यांच्या कार्यालयावर गेल्यानंतर संपर्कप्रमुखांनी त्यांना एका हॉटेलवर बोलावून दम भरल्याची चर्चा आहे.
आ. शिरसाट यांच्या प्रसिद्धिपत्रकात माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट, शिल्पाराणी वाडकर, गजानन बारवाल, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, राजू राजपूत, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, विभागप्रमुख मंगेश जाधव, रणजित ढेपे, संतोष जाटवे, शाखाप्रमुख ईश्वर पारखे, शिवाजी हिवाळे, रामेश्वर पेंढारे, मनोज सोनवणे, राजेश जंगले, सचिन राठोड, अनिल बिरारे, विजय पैठणे, गुडू बन्सीवाल, विनोद बनकर, अमर सभादिंडी, श्रीकांत साळे, महेश भोंडवे, गणेश भोंडवे, संतोष नरवडे, सचिन गरड, विशाल खंडागळे, अरुण हिवाळे, संदीप आरके, गणेश जाधव, राजन गरबडे, नीलेश नरवडे, राम पाटोळे, शेखर जाधव, राजेश कसुरे, ज्योतीराम पाटील, सागर वाघचौरे, कैलास भोकरे, रमाकांत भांगे, पोपटराव हांडे, विकी साळवे, नंदू चौथमल, सचिन शिंदे, सचिन वाहूळकर, बंटी सोनवणे, विकी पाटील, गजानन पाटील, संदीप डेव्हरे, धीरज बारवाल, मनदीप राजपूत, लखन दळवी, राजू लिंगे, सतीश जाधव यांची रॅली व कार्यालयात उपस्थिती असल्याचे कळविण्यात आले.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख काय म्हणतात..?जिल्ह्यातील बंडखाेरांच्या रॅलीत जे सहभागी झाले व होतील त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून कारवाई करणार असल्याचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी सांगितले. विमानतळावर आ. शिरसाट यांच्यासोबत राजेंद्र जंजाळ, भोंडवे यांच्यासह युवा सेनेचे व शिवसेनेचे काही पदाधिकारी होते. बंडखोरांकडे जे-जे पदाधिकारी जातील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आ. भुमरे, आ. जैस्वालांकडे पक्षातील कोण होते, याची माहिती घेण्यात येत आहे.
कार्यालयावर शिवसैनिक फिरकले नाहीतआ. जैस्वाल, आ. शिरसाट यांच्या कार्यालयावर दुसऱ्या दिवशी शिवसेना पदाधिकाऱ्यांची रेलचेल दिसून येईल, असे वाटले होते. परंतु काही मोजके पदाधिकारी सोडले तर सामान्य नागरिकांविना पक्ष पदाधिकारी त्यांच्या कार्यालयाकडे फिरकले नाहीत.