औरंगाबाद : कन्नडचे माजी आ. हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणुकीच्या मागे-पुढे पुंडलिकनगर वॉर्डातील हनुमाननगर येथील हनुमान मंदिर सभागृह बांधण्यासाठी १२ लाख रुपयांची देणगी दिली होती. पण तीन वर्षांत सभागृहाचे बांधकाम केले नसल्यामुळे संतप्त बनलेल्या माजी आ. जाधव यांनी रविवारी कॉर्नर बैठक घेत, सभागृह बांधा, नाही तर दिलेली देणगी परत द्या, अशी भूमिका घेतली.
हनुमान चौकात झालेल्या या कॉर्नर सभेला परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी जाधव म्हणाले, सभामंडप बांधा, नाही तर माझे १२ लाख परत करा. कुणी देत नाही, मंदिर बांधण्यासाठी निधी. मी दिला होता, तर त्याचा वापर केला नाही. १२ लाख देऊनही काही होत नसेल, तर यापुढे मंदिरांना कुणी देणगी देणार नाही. २०१९ साली मदत केली होती. शिवसेना, भाजप व इतर पक्ष मंदिरात महाआरत्यांना पुढे असतात, मात्र देणगी देण्यास मागे असतात, असा आरोपही त्यांनी केला.
हनुमान मंदिराचे विश्वस्त नीळकंठ मुसणे यांनी सांगितले, जाधव यांनी मंदिर परिसरातील सभागृह बांधण्यास १२ लाखांची देणगी दिली आहे. परंतु लॉकडाऊन लागल्यामुळे सगळे काही ठप्प पडले. दरम्यान, सभागृह बांधण्याचा खर्च ६० लाखांहून पुढे गेला आहे. मंदिराचे विश्वस्त अंदाजपत्रक, आराखडा तयार करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.