छत्रपती संभाजीनगर : बांधकाम साहित्याचा व्यवसाय करणारे श्याम सोनवणे यांचा मालवाहतूक करणारा टेम्पो मालासह पिसादेवी रस्त्यावरील महादेव मंदिरासमोरून चोरीला गेला. बुधवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर गाडी चोरीला गेल्याची नोंद करण्यासाठी ते १२ तास ४ पोलिस ठाण्यांमध्ये फिरत राहिले. मात्र, 'ही हद्दच आमची नाही' असे सांगून त्यांना सगळीकडून परतवून लावण्यात आले. १२ तास फिरवले. ४८ तास उलटूनही सोनवणे यांच्या गाडीची चोरी झाल्याची नोंद एकाही ठाण्याने केली नाही. त्यामुळे कोणी पोलिस अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी हद्द सांगेल का, असा संतप्त प्रश्न विचारण्याची वेळ एका नागरिकावर आली.
गुरुवारी सोनवणे यांनी गाडी (एम एच २० - ई एल - १९७०)त माल भरून मंगळवारी सायंकाळी पिसादेवी रस्त्यावरील मातोश्री सिमेंट प्रोडक्ट या कारखान्यासमोर उभी केली. बुधवारी सकाळी ७ वाजता ती आढळून आली नाही. गाडीचा इतरत्र शोध घेऊन त्यांनी सिडको पोलिस ठाणे गाठले. सिडको पोलिसांनी हद्द आमची नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली. सोनवणे पुढे तीन पोलिस ठाण्यांमध्ये गेले. मात्र, एकाही ठाण्यात त्यांना उभे केले गेले नाही. त्यामुळे सोनवणे यांंच्यावर 'आमची हद्द कोणत्या पोलिस ठाण्याअंतर्गत येते, तक्रार नोंदवावी तरी कुठे, हे कळवावे', अशा मागणी पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांकडे करण्याची वेळ आली. दरम्यान, सोनवणे यांनी फायनान्स कंपनीलाही संपर्क साधला. मात्र, सर्व हप्ते वेळेवर भरलेले असल्याने कंपनीनेदेखील गाडी नेली नसल्याचे स्पष्ट केले.
१२ तास, ९ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट, परिणाम शून्य- वेळ सकाळी ९ - सिडको पोलिस ठाणेबुधवारी ९ वाजता सोनवणे सिडको पोलिस ठाण्यात गेले. तेथे चारचाकीतून दोन कर्मचारी घटनास्थळी गेले. हद्द नसल्याचे सांगून हर्सूल ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला.- वेळ सकाळी ११ - हर्सूल पोलिस ठाणेठाण्यात बसूनच तुम्ही सांगताय, ती जागाच आमच्या हद्दीत येत नाही. आमच्याकडे येऊही नका. एमआयडीसी सिडकोत जा, असे सांगून परस्पर बाहेर हाकलले.-वेळ दुपारी १ - एमआयडीसी सिडको ठाणेएमआयडीसी सिडको ठाण्याचा एक कर्मचारी सोनवणे यांच्यासोबत घटनास्थळी गेला. नंतर आणखी एका कर्मचाऱ्याला बोलावून घेतले. ही हद्द चिकलठाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात येते, असे सांगून त्यांनी अंग काढून घेतले.-वेळ दुपारी ४ - चिकलठाणा पोलिस ठाणे (ग्रामीण)चिकलठाणा पोलिसांनी पिसादेवीतून गस्तीवरील पाेलिसांना घटनास्थळी पाठविले. त्यांनी बराच वेळ पाहणी करून पहिल्या तीन ठाण्यांची री ओढत काढता पाय घेतला.
डायल ११२ ही 'कन्फ्युज'संकटकाळी मदतीसाठी निर्माण केलेल्या डायल ११२ लाही सोनवणे यांनी संपर्क केला. त्यांच्याकडे अद्ययावत टॅब, लोकेशन सिस्टम असते. मात्र, तेही भेट दिल्यानंतर 'कन्फ्युजन' मध्येच उत्तर देऊन निघून गेले.
कायमच टाळाटाळ, वरिष्ठांकडून दुर्लक्षगुन्ह्यांची आकडेवारी लपवण्यासाठी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये चोरीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी ही शक्कल लढवली जात असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये वाहन चोरीत १५ ते २० दिवसांनंतर गुन्हा दाखल केला जात आहे. तक्रारदाराला ठाण्यात तासन्तास बसवून ठेवणे, पुन्हा पुन्हा बोलावले जात असल्याचेही अनेकदा निदर्शनास आले. मात्र, वरिष्ठांकडूनदेखील याकडे दुर्लक्ष केले जाते, हे विशेष.
२०२३ मध्ये केवळ २८५ वाहने सापडली२०२३ मध्ये वाहन चोरीच्या विक्रमी ८९६ घटना घडल्या. त्यापैकी शहर पोलिस केवळ २८५ वाहनांचा शोध लावू शकले.