छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-१ ते एन-१३ पर्यंत सिडको प्रशासनाने नागरी वसाहती, व्यापारी संकुल उभे केले. २००६ मध्ये सिडकोचे मनपाकडे हस्तांतरण झाल्यानंतर या भागात सिडकोचे बरेच दुर्लक्ष झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली. एका सुंदर शहराला बकालपणा येऊ लागला. अखेर याची खंडपीठाला दखल घ्यावी लागली. न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाने प्रथम अतिक्रमणे काढली. न्यायालय समाधानी नसल्याचे लक्षात आल्यावर सूक्ष्म सर्वेक्षण सुरू झाले. त्यामध्ये ‘ऑड शेप’च्या जागांवर हजारो अतिक्रमणे असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
सिडकोत विविध कंपन्यांमधील कामगार वर्गाला स्वस्त घरे मिळावीत, या उद्देशाने गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात आले. प्रारंभी बहुतांश कामगार वर्गानेच ही घरे खरेदी केली. सिडको-हडकोला एक आकार मिळाला. त्यामुळे घरांच्या किमती प्रचंड वाढल्या. नागरिकांनी सिडकोचे मूळ घर तोडून दोन ते तीन मजल्यांपर्यंत इमारती उभ्या केल्या. हे सर्व बदल सिडको प्रशासनाच्या साक्षीने सुरू होते. राज्य शासनाने २००६ मध्ये अचानक सिडको-हडकोचे मनपाकडे हस्तांतरण केले. त्यामुळे सिडको प्रशासनाने या भागाकडे लक्ष देणे कमी केले. हळूहळू अतिक्रमणे वाढत गेली. जिथे मोकळी जागा दिसेल, तेथे नागरिकांनी बांधकामे केली. अतिक्रमणांचा मुद्दा खंडपीठात पोहोचला. खंडपीठाच्या आदेशानुसार तीन महिन्यांपूर्वी मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली. ही संख्या हजाराेंपेक्षा जास्त होती.
कारवाईचा अहवाल खंडपीठात दाखल करण्यात आला. खंडपीठाने त्यावर नाराजी दर्शविली. अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी खंडपीठाला सूक्ष्म नियोजन करून आणखी अतिक्रमणे काढण्याचे आश्वासन दिले. मागील एक महिन्यापासून मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाचे पथक सिडकोच्या अधिकारी मिलन खिल्लारे यांच्यासोबत सर्वेक्षण करीत आहे. सिडको प्रशासनाने जेवढी बांधकाम परवानगी दिली, त्यापेक्षा जास्त बांधकाम असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले.
ऑड शेपच्या जागा गायबमनपाच्या सर्वेक्षणात आणखी एक बाब उघडकीस आली, ऑड शेपच्या जागांवर हजारोंच्या संख्येने अतिक्रमणे झाली आहेत. श्रीकृष्ण नगर, सुदर्शननगर, एन-६ भागातील मथुरानगर, एन-१२ परिसरातील नवजीनवन कॉलनी इ. भागांत अनेक ऑडशेपच्या जागांवर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले. ही अतिक्रमणे काढण्यासाठी मनपा नियोजन करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.