औरंगाबाद: प्रवाशी महिलेसोबत मैत्री करून तिला कांचनवाडीच्या जंगलात नेऊन तिच्या इच्छेविरोधात सतत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या रिक्षाचालकाविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. याविषयी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. हारूण खाजामिया कुरेशी(२८,रा. साईनगर, गारखेडा परिसर)असे आरेापीचे नाव आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार विवाहिता ही शहरातील एका दुकानात नोकरी करते. घर ते दुकान असे रिक्षाने ये- जा करीत असताना तिची ओळख आरोपी रिक्षाचालक हारूणसोबत झाली. यादरम्यान त्यांच्यात ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. आणि तो तिला नियमित तिच्या घरापासून रिक्षात बसवून दुकानात नेऊन सोडत. जानेवारी महिन्यात ती दुकानात जाण्यासाठी त्याच्या रिक्षात बसल्यानंतर तो तिला घेऊन कांचनवाडीच्या जंगलात गेला. तेथे त्याने तिच्या इच्छेविरोधात तिच्यावर अत्याचार केला. यानंतर त्याने तिच्यासोबत मोबाईलमध्ये छायाचित्रे काढली.
तेव्हापासून तो तिला छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत सतत ब्लॅकमेल करीत होता. तिला मारहाण आणि शिवीगाळ करून त्याने १५ ते १८ वेळा तिच्यावर अत्याचार केले आणि लग्नासाठी आग्रह करीत होता. पिडीतेने त्याच्या या त्रासाला कंटाळून त्याच्याशी बोलणे बंद केले. यानंतरही आरोपी तिचा पाठलाग करीत असत. अखेर कंटाळून पीडितेने बुधवारी रात्री सातारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक अनिता फसाटे तपास करीत आहेत. आरोपीला अटक करण्यात आले आहे.
भरचौकात पोलिसासमक्ष जीवे मारण्याची धमकी२३ ऑगस्ट रोजी आरेापीचा भाऊ शहारूख पीडितेच्या घरी गेला आणि तु हारूणसोबत लग्न कर, असे म्हणाला. तेव्हा पीडितेच्या आईवडिलांनी त्याला समजावून सांगितले आणि हारूणला पीडितेचा पाठलाग करू नको असे समजावून सांगण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पीडिता आई-वडिलासोबत कामावर जात असताना आरोपीने त्यांना अडवून आरडाओरड करत शिवीगाळ केली. तेव्हा तेथे आलेल्या वाहतूक पोलिसांनी त्यांचे भांडण सोडविले यावेळीही आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी िदली.