औरंगाबाद : शिवसेनेच्या स्थापनेपासून काम करीत असतांना ज्यांना पक्षाने संधी दिली, ते फळे खाऊन पळून गेले, निष्ठावंत उपाशीच राहिले, असा सूर निष्ठावंत-एकनिष्ठ शिवसैनिकांच्या निर्धार मेळाव्यात ज्येष्ठ शिवसैनिकांनी सोमवारी आळविला.
ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट या राजकीय युद्धात शिवसेना नाव व पक्षचिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याची आर्त हाक देण्यासाठी संत एकनाथ रंगमंदिरात निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर आरोपांची तोफ डागण्यात आली, तर शिवसेनेच्या शाखा स्थापनेपासून काम केलेले, मात्र, उपेक्षित राहिलेल्यांनी मेळाव्यात जोरदार भाषण करीत शिवसैनिकांच्या मनातील अस्वस्थतेला हात घातला.
मेळाव्यात ज्येष्ठ शिवसैनिक रमेश सुपेकर म्हणाले, पक्षाने बेगड्यांना मोठे केले. ज्यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली, पक्षासाठी रक्त सांडले, असे अनेकजण सद्य:स्थितीत पानटपरी चालवून, तर प्लॉटिंग एजंटचे काम करून उदरनिर्वाह करीत आहेत. असे असले तरी आम्ही ठाकरे यांच्यासोबतच राहू.माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी, हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान दिले. शहरप्रमुख बाळासाहेब थोरात म्हणाले, सर्वांना अपेक्षा ठेवून चालणार नाही. येणाऱ्या काळात सत्ता व पक्षताकद निर्माण करावी लागणार आहे. अनिल पोलकर यांनी युवा सेनेला आक्रमक होण्याचे आवाहन केले. शहरप्रमुख विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, गजानन बारवाल, सुनील आऊलवार, अनिता घोडेले, कला ओझा, बंडू ओक, प्रभाकर मते, प्रतिभा जगताप, सुनीता देव, अनिता कोल्हे, आदींची उपस्थिती होती.
समोर बसलेले निष्ठावंत वाटायचेआमदार म्हणून निवडून आल्यानंतर शिंदे गटात गेलेले सगळे समोर बसलेले असायचे, त्यामुळे जास्त निष्ठावंत असल्याचे वाटायचे. मात्र, कधी गुवाहाटीला पळाले, हे कळलेच नाही. असे आ. उदयसिंग राजपूत म्हणाले. गद्दारांनी व्हीप बजावला तरी काय व्हायचे ते होऊ द्या, ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांवर टीकामुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली. चिन्ह गेले तरी काळजी करू नका. शिवसेना ठाकरेंची आहे. औरंगाबाद बालेकिल्ला असून, पाचही गद्दार यापुढे निवडून येऊ नयेत, असे काम करा. गद्दारी करणाऱ्यांचे काळे धंदे चव्हाट्यावर आणण्याचा इशारा दानवे यांनी दिला.
दोन्ही आमदारांवर निशाणामध्य व पश्चिम मतदासंघाच्या आमदारांवर चंद्रकांत खैरे यांनी निशाणा साधला. दोन्ही आमदारांसाठी लोकांच्या हातापाया पडलो. त्यांच्याही मागे ईडी, आयटीवाले लावतील. त्यांना युज ॲण्ड थ्रो करतील. शिवसेना संपविण्यासाठी भाजपाने हा प्रकार केला आहे. क्रांती चौकच्या माजी नगरसेविकेचे नाव न घेता त्यांच्यावर खैरेंनी टीका केली.