छत्रपती संभाजीनगर : जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवात ‘ग्लोबल आडगाव’ या चित्रपटाचा समावेश करण्यात आल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केली. पुणे, कोलकाता येथील नामवंत चित्रपट महोत्सवात झळकलेला हा सिनेमा आता गोव्यात आपली कमाल दाखवणार आहे.
शहरातील प्रा. अनिल साळवे लिखित-दिग्दर्शित हा चित्रपट राज्य सरकारने फिल्म मार्केटसाठी निवडला आहे. अभिनेत्री किशोरी शहाणे, प्रसाद नामजोशी, हर्षित अभिराज, समीर आठल्ये, संदीप पाटील यांच्या समितीने ३० चित्रपटांतून या चित्रपटाची निवड केली. अमेरिकेत नुकताच या चित्रपटाचे लेखक म्हणून अनिल साळवे यांचा सन्मान करण्यात आला. या सिनेमातून शेती, माती, ग्रामसंस्कृती, त्याचबरोबर जागतिकीकरणामुळे शेतीचे झालेले नुकसान इ. विषयांवर भाष्य करण्यात आले आहे.
'ग्लोबल आडगाव' चित्रपट यापूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह न्यू जर्सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अमेरिकेत देखील झळकला आहे. चित्रपटास देश-विदेशातील नामवंत प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.नुकत्याच संपन्न झालेल्या अजंता_एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अशोक कानगुडे याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये,अनिल नगरकर, सिद्धी काळे, शिवकांता सुतार, अशोक कानगुडे, महेंद्र खिल्लारे, रौनक लांडगे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, डॉ. सिद्धार्थ तायडे, साहेबराव पाटील,प्रदीप सोळंके, रानबा गायकवाड, विष्णू भारती, जालिंदर केरे, विक्रम त्रिभुवन,विष्णू चौधरी, परमेश्वर कोकाटे, प्राजक्ता खिस्ते, ऋषिकेश आवाड विक्की गुमलाडू,मंगेश तुसे यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत. डॉ.विनायक पवार, प्रशांत मांडपुवार, अनिलकुमार साळवे यांनी रचलेल्या गीतांना प्रख्यात गायक आदर्श शिंदे, डॉ.गणेश चंदनशिवे आणि जसराज जोशी यांनी स्वरसाज चढविला आहे. मराठवाड्याच्या मातीत तयार झालेला चित्रपट आता गोवा आंतरराष्ट्रीय महोत्सवात झळकत असल्याने सिनेरसिकांनी आनंद व्यक्त केला आहे.