छत्रपती संभाजीनगर : आज मागणी पूर्ण होईल, उद्या पूर्ण होईल, या आशेवर ईपीएस -९५ पेन्शनधारक वर्षानुवर्षे लढत आहेत. सारखी आंदोलनं, दिल्लीवाऱ्या करूनही सध्या तरी पदरी निराशाच पडलेली आहे. खा. हेमा मालिनी यांनीसुध्दा हा प्रश्न लोकसभेत मांडला. पण, २०१४ पासून काहीही घडलं नाही. पेन्शनधारकांचा लढा सुरूच आहे.
येत्या २४ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वा. बजाजनगरात याच प्रश्नावर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याच्या प्रचारार्थ रोज त्या-त्या भागातील पेन्शनधारकांच्या बैठकांचा धडाका समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर, संपर्कप्रमुख अरुण कुलकर्णी व शहराध्यक्ष सी. एम. कांबळे व विश्वनाथ जांभळे, मुकुंद कोकणे आदींच्या नेतृत्त्वाखाली सुरू आहे.
आतापर्यंत छ. शिवाजीनगर, गारखेडा येथे, दुसरी वारकरी भवन, आविष्कार कॉलनी, एन-६ येथे, तर तिसरी बैठक १२ सप्टे. रोजी मारुती मंदिर, न्यू हनुमाननगर, पुंडलिकनगर येथे झाली. शुक्रवारी हनुमान मंदिर, के-सेक्टर-एन ९, पवननगर, हडको येथे हरीश राठोर व विश्वनाथ जांभळे यांनी ही बैठक घेतली.
हिंमत न हारता लढाई लढूउत्तम जाधव यांनी सांगितले की, आज सुपात असलेले उद्या जात्यात येणार आहेत. संपतराव शिवनकर म्हणाले, लढण्याचं वय नाही. पण, लढावंच लागतंय. सुभाष माळी म्हणाले, हिंमत न हारता लढाई लढू. विजय आपलाच होणार आहे. सरकार सर्वांसाठी योजना आणत आहे. मग आम्ही वृध्द ईपीएस-९५ वाल्यांनीच काय पाप केलं? वय नसतानाही आमच्यावर लढण्याची वेळ आली आहे. सध्या पेन्शन म्हणून मिळत असलेले पैसे आमच्या औषधालाही पुरत नाहीत, असे आशा शेळके, पंडितराव तुपे, नारायण भागवत, दगडू तुपे, बाबूराव राऊत, मधुकर घोरपडे आदींनी सांगितले.