छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहराची लाइफ लाइन असलेला रोशनगेट ते बुढीलेन रस्ता स्मार्ट सिटी नव्याने तयार करते आहे. परंतु नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. पहिल्या टप्प्यात चंपा चौक ते चेलीपुरा रस्त्याचे काम एक महिन्यापूर्वी सुरू करून सर्वत्र खोदकाम करण्यात आले. परंतु ड्रेनेज लाइन आणि नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरूच झाले नाही. त्यात सोमवारी झालेल्या पावसामुळे रस्त्याचे चक्क तळे झाले. त्यातून मार्ग शोधतांना नागरिकांची त्रेधा उडाली.
स्मार्ट सिटी व मनपातर्फे शहरात १११ रस्त्यांची कामे करण्यासाठी ए.जी. कन्स्ट्रक्शनची निवड केली. ३१७ कोटी रुपये या कामांवर खर्च करण्यात येत आहेत. आतापर्यंत ७२ पेक्षा अधिक रस्त्यांची कामे पूर्ण झाली. रोशनगेट ते मनपा मुख्यालयापर्यंतच्या रस्त्याची डागडुजी अभावी दुर्दशा झाली होती. अनेक माजी नगरसेवकांच्या वॉर्डातून हा मुख्य रस्ता जातो. त्यांनीही याकडे कधी लक्ष दिले नाही. स्मार्ट सिटीने या रस्त्याचे काम सुरू केल्याने नागरिकांना झालेला आनंद मात्र लवकरच वेदनेत बदलला.
स्मार्ट सिटीने महिनाभरापूर्वी चंपाचौक ते चेलीपुरा हा रस्ता खोदून ठेवला. परंतु अद्याप मनपाने अद्याप ड्रेनेज, जलवाहिन्या शिफ्टिंगचे काम सुरू केले नाही. जीव्हीपीआर कंपनीने नवीन जलवाहिन्या टाकल्या नाहीत. काम बंद असल्याने परिसरातील नागरिक, व्यापाऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी दर्शविली.
अत्यंत महत्त्वाचा रस्ता २४ तास या रस्त्यावर नागरिकांची वर्दळ असते. जुन्या शहरातील हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून, मनपा, स्मार्ट सिटीने तो त्वरित करून द्यावा. - खलील खान, नागरिक.
दवाखाने, मेडिकल, लॅबचंपाचौक ते चेलीपुरा या रोडवर सर्वाधिक दवाखाने, मेडिकल शॉप, पॅथॉलॉजी लॅब आहेत. याशिवाय रहिवासी वसाहत मोठी आहे. आम्हाला पर्यायी रस्ताच नाही. खोदलेल्या खड्ड्यातून रुग्ण कसेबसे ये-जा करीत आहेत. याचा मनपा, स्मार्ट सिटीने विचार करावा.फय्याज सिद्दीकी, नागरिक.
लकरच रस्ता ड्रेनेजचे काम सुरू केले आहे. मनपाची कामे होताच रस्ता तयार केला जाईल. - इम्रान खान, प्रकल्प प्रमुख, स्मार्ट सिटी