औरंगाबाद : दागिने घालून मिरविणे ही काही महिलांची मक्तेदारी राहिली नाही... आता पुरुषांमध्येही दागिने घालण्याचा कल वाढत आहे. गळ्यातील सोन्याची जाड चेन (साखळी) दिसावी म्हणून खास शर्टची वरील गुंडी उघडी ठेवली जाते. मनगटातील पिवळे धमक ब्रासलेट असो की चार दहा बोटातील अंगठ्या ‘श्रीमंती’ दाखविण्याचा व समोरच्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा छाप पाडण्यासाठी बहुतांश लोक ‘गोल्डमॅन’ बनत आहेत. यात राजकारणी, कंत्राटदार, जमीनदार, धनाढ्य शेतकऱ्यांमध्ये दागिन्याची ‘क्रेझ’ जास्त दिसून येत आहे.
पुरुषांना काय आवडते...१) साखळी : पुरुषांना गळ्यातील साखळी जास्त आवडते. त्यातील त्यात जाड साखळी विशेष पसंत केल्या जाते. ८ ते १५ तोळ्यांपर्यंतची सोन्याची साखळी घातली जाते. ती दिसावी म्हणून शर्टची वरची गुंडी उघडी ठेवली जाते.२) ब्रेसलेट : हातात पूर्वी स्टील किंवा तांब्याचे कडे घातले जात होते; पण आता सोन्याच्या ब्रेसलेटची क्रेझ आहे. ब्रेसलेटही आता असंख्य डिझाईनमध्ये उपलब्ध झाले आहेत. लग्नसराईत जावाईबापूलाही हौशीने असे ब्रेसलेट दिले जात आहे.३) अंगठी : बोटात अंगठी घालणे ही पूर्वीपासून पुरुषवर्ग पसंत करत आहे. विशेषत: राशीनुसार खड्यांची अंगठी जास्त परिधान केली जाते. सोन्यात किंवा चांदीत या अंगठ्या असतात. मात्र, आता सोन्यामध्ये विविध डिझाईनच्या अंगठी आल्या आहेत.४) पेंडेंट : पूर्वी पेंडेंटवर फक्त महिलांचा अधिकार असत. मात्र, ही मक्तेदारी आता मोडीत काडीत पुरुषांनीही पेंडेंट दागिने परिधान करणे सुरू केले आहे. चित्रपटाचा प्रभावही यावर दिसून येत आहे. ज्वेलर्सनेही त्यानुसार पेंडेंट बनविणे सुरू केले आहे.
दागिने वापरणारे काय म्हणतात ?गोल्डमॅनची क्रेझदेशात अनेक गोल्ड मॅन आहेत. कोणी गळाभरून सोन्याच्या चेन घालतात तर कोणी सोन्याचे शर्ट परिधान करते. हीच क्रेझ तरुणाईमध्ये निर्माण झाली आहे. आम्ही आमच्या ऐपतीनुसार सोन्याची चेन, ब्रेसलेट, अंगठी घालतो. कोणी मला गोल्ड मॅन म्हटले की आवडते.- अविनाश पाटील
अंगठ्या घालण्याची हौसपूर्वी राशीनुसार खड्यांची अंगठी घालत असे, तेव्हापासून अंगठी घालण्याची हौस निर्माण झाली. अंगठा सोडून बाकीच्या आठ बोटांमध्ये सोन्याच्या विविध डिझाईनच्या अंगठ्या घालणे ही पॅशन बनली आहे.आता कानातील ‘बाळी’ घालणे सुरू केले आहे. यामुळे मित्रवर्गात मी जरा हटके दिसतो.- नीलेश शर्मा
श्रीमंतीचा दिखावा‘सोन्याचे दागिने’ हे श्रीमंतीचे लक्षण आहे. ही श्रीमंती दुसऱ्यांना दाखवून प्रभाव पाडण्यासाठी अनेक पुरुष दागिने परिधान करू लागले आहेत. काहीजण जाड आकारातील चेन, ब्रेसलेट खास तयार करून घेत आहेत. देशातील ‘गोल्डमॅन’चा प्रभाव या मंडळीवर जास्त दिसून येत आहे.- जुगलकिशोर वर्मा
व्यवसायवाढीसाठी सकारात्मकपुरुषांमध्येही दागिने घालण्याचा नवा ट्रेंड आला आहे. यामुळे आता ज्वेलर्सला नवीन ग्राहक वर्ग मिळाला आहे. असे नवनवीन ट्रेंड व्यवसायवाढीसाठी सकारात्मक भूमिका बजावत आहेत.- राजेंद्र मंडलिक