औरंगाबाद : अलीकडे काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा विचार करता जिल्ह्यातील जि.प. शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात, अशी मागणी अनेक शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक समिती, आदर्श शिक्षक समिती, शिक्षक भारती, शिक्षक सेना या संघटनांनी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांना १ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याची विनंती केली आहे.
संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिले की, फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उष्णता जाणवते. दुसरीकडे, ग्रामीण भागामध्ये आतापासून पाण्याची टंचाईदेखील जाणवायला लागली आहे. याशिवाय ग्रामीण भागामध्ये ५० टक्के शाळांच्या वर्गखोल्यांना पत्र्याचे शेड आहेत. विद्यार्थ्यांना त्यामध्ये बसूनच विद्यार्जन करावे लागत आहे. वर्गखोलीतील उष्णता वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसणे असह्य होत आहे. अनेक शाळांचे बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता नियमित तासिकांमध्ये फरक न करता एक मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात.
यासंदर्भात प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, रंजीत राठोड, नितीन नवले, श्याम राजपूत, गुलाब चव्हाण, विष्णू भंडारी, दिलीप रासने, के.के. जंगले, सतीश कोळी, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष बरबंडे, संजीव देवरे, जिल्हाध्यक्ष राजेश भुसारी, मच्छींद्र भराडे, संतोष ताठे, महेंद्र बारवाल, शिक्षक सेनेचे दीपक पवार, प्रभाकर पवार, सदानंद माडेवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्याही निदर्शनात ही बाब आणून दिली आहे.