खुलताबाद (औरंगाबाद): तालुक्यातील गदाणा येथील फुलंब्री मार्गावरील वनविभागाच्या जगंलात एका झाडाला सुया टोचून नारळाचे तोरण बांधून पुजा केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. अंधश्रद्धेचा कळस असलेल्या या प्रकारची वार्ता गावात पसरताच एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
खुलताबाद-फुलंब्री मार्गावरील गदाणा येथील गावाशेजारील वनविभागाच्या निगरानील जगंल आहे. जंगलाचा काही भाग महामार्गाजवळ आहे. आज सकाळी जंगलातील एका झाडाला सुया टोचून नारळाचे तोरण लटकवलेल आढळून आले. ग्रामस्थांनी जवळ जावून पाहिले असता खाली महापुजा घातल्याचे आढळून आले. हा अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली. कोणीतरी अंधश्रद्धेतून जादूटोण्याचा प्रकार केलेला असल्याची शक्यता आहे. याची वार्ता पसरताच ग्रामस्थांनी एकच गर्दी केली, पण हा प्रकार लांबूनच बघणे पसंद केले. कुणाला तरी त्रास देण्याच्या उद्धेशाने किंवा द्वेषभावनातून हा अंधश्रद्धेचा प्रकार केला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
....जादुटोणा विरोधी कायदा असूनही प्रकार वाढले महाराष्ट्र शासनाने राज्यात जादुटोणा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आणला असला तरी ग्रामीण भागात आजही अंधश्रद्धा व जादूटोणा करण्याचे प्रकार सतत घडत आहे. नुकतेच चंद्रग्रहण होऊन गेले त्यारात्रीच हा प्रकार घडला असावा अशीही चर्चा गदाणा गावात आहे.