औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी, अशी याचिका औरंगाबाद हायकोर्टाने आज फेटाळून लावली आहे. यासोबतच याचिकाकर्ते रिपब्लिकन युवा आघाडीचे जयकिसन कांबळे यांना कोर्टाने १ लाख रुपयांची कॉस्ट लावली. यामुळे आता सभेसाठीचे सर्व अडथळे दूर झाले आहेत.
१ मे रोजी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. 'मशिदीवरील भोंगे हटाव' मोहीम हाती घेतल्यानंतर केलेल्या घोषणेपासूनच सभेच्या विरोधात आणि समर्थनात वातावरण निर्माण झाले होते. यामुळे पोलिसांनी ग्राउंड रिपोर्ट घेऊन अटीसह सभेला परवानगी दिली. मात्र, सभेला दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी,अशी याचिका आज औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली.
खंडपीठाने याचिका फेटाळत राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच याचिकाकर्त्यास १ लाख रूपयांची कॉस्ट लावली. कॉस्टची रक्कम तीन दिवसात भरण्याचा आदेश कोर्टाने दिला.
या अटींसह होणार 'राजसभा' जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करू नये, या सह १६ अटी पोलिसांनी सभेला परवानगी देताना घातल्या आहेत. पोलिसांनी घातलेल्या अटीमध्ये सदर सभा ०१/०५/२०२२ रोजी १६.३० ते २१.४५ या वेळेतच आयोजीत करावी. तसेच कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, असं सांगण्यात आलं आहे. तसेच सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये, असं म्हटलं आहे. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगु नये, अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये, अशी तंबीही पोलिसांनी दिली आहे.