सिल्लोड: शहरातील बालाजी नगर परिसरात राहणाऱ्या महिलेच्या पतीच्या छातीत अचानक चमक निघाली त्यांनी लगेच पतीला सिल्लोड व नंतर औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, इकडे घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात घुसत ३ लाखाची रोकड आणि ३ लाख २८ हजारांचे सोन्याचे दागिने असा ६ लाख २८ हजारांचा ऐवज लंपास केला.
जयश्री नंदकिशोर संचेती ( रा. बालाजी नगर) यांच्या घरात ही चोरी झाली आहे. त्यांचे पती नंदकिशोर संचेती यांची अचानक प्रकुर्ती खराब झाल्याने त्यांना २३ फेब्रुवारी रोजी सिल्लोड व नंतर औरंगाबाद व अहेमदनगर येथे रुग्णालयात दाखल केले. ते व त्यांचा मुलगा रुग्णालयात असताना २३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे कुलूप तोडत त्यातील ३ लाख रोकड आणि ३ लाख २८ हजारांची दागिने लंपास केली.
संचेती सोमवारी रुग्णालयातून परत आले तेव्हा घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून सोमवारी रात्री (२८ फेब्रुवारी ) रोजी तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, सहायक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगे, फौजदार वाघुले यांनी घटनेचा पंचनामाकरून सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. घटनास्थळी डॉग स्कॉट व फिंगर एक्स्पपर्ड पथक यांना पाचारण केले होते मात्र त्यातून काही महत्वाचे हाती आले नाही.या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगे करत आहे.