छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा भागातील दंगलीच्या चौकशीसाठी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या पथकामध्ये सात अधिकारी व तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दंगलीत सहभागी असणाऱ्या आठ जणांना अटक केली असून, २० ते २५ जणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
बरकत शौकत शेख (२३), शेख अतिक शेख हारुण (२४), सद्दामशहा बिस्मिल्ला शहा (३३), शेख खाजा शेख रशीद (२५), शारेख खान इरफान खान (२३), शेख सलीम शेख अजीज (२५), सय्यद नूर सय्यद युसूफ (३०) आणि शेख नाजीम शेख अहेमद (२४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी आठ पथके तैनात केली आहेत. या पथकांनी गुरुवारी दिवसभरात आठ जणांना अटक केली. त्याशिवाय २० ते २५ आरोपींची ओळख पटविली आहे.
दंगलीतील मृतावर अंत्यसंस्कार
दंगलीत गंभीर जखमी व्यक्तीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. या मृतदेहाचे न्यायाधीशांच्या उपस्थितीत इन कॅमेरा गुरुवारी मध्यरात्री विच्छेदन केले. त्यानंतर मृतावर मोंढा नाका परिसरातील कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शेख मुनिरोद्दीन शेख मोहियोद्दीन (रा. किराडपुरा) असे मृताचे नाव आहे.