कन्नड - शहरातील शिवनगर भागात भाडेकरूने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मण पुरी असे मृताचे नाव असून तीन ते चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. घरातून दुर्गंधी येत असल्याने घरमालकाने याची माहिती पोलीसांना दिली.
शिवनगरमध्ये लक्ष्मण सखाराम पुरी ( ४५, मुळगाव पैठण ह. मु. कन्नड ) हा कैलास वाल्मीक गोरे यांच्या घरात भाड्याने राहत होता. तीन ते चार दिवसांपासून त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. घरातून दुर्गंधी येत असल्याने घरमालक गोरे यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच सपोनि सचिन खटके, बीट अंमलदार मोईस बेग, पंकज गाभुड, धोंडकर व नरोडे यांनी घटनास्थळी जाऊन खोलीचा दरवाजा तोडला. आत लक्ष्मण पुरी याने पंख्याला दोरी बांधून गळफास घेतल्याचे आढळून आले. मृतदेह कुजू लागल्याने दुर्गंधी पसरली होती. अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केलेली असावी असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.
डीटीपी ऑपरेटर म्हणून होता कार्यरत लक्ष्मण पुरी हा उत्कृष्ट टायपिस्ट होता. तो शहरातील स्टँप वेंडरकडे डीटीपी ऑपरेटर म्हणून कामाला होता. घरात त्याच्यासह पत्नी आणि दोन मुले राहत होती. त्यास दारूचे व्यसन होते. पती-पत्नीचे भांडण झाल्याने पत्नी दोन्ही मुलांसह माहेरी गेलेली होती. दारुच्या नशेतच त्याने गळफास घेतलेला असावा असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.