छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्थानक परिसरात बाकड्यांवर थांबलेल्या प्रवाशाला दोन जणांनी बेदम मारहाण करीत मध्यरात्री लुटले. त्याची माहिती ११२ नंबरवर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी पोलिस आल्यानंतर त्यांनी चोरट्यांचा परिसरात शाेध घेतला असता, दोघेजण दिसले. पोलिसांना पाहताच त्यांनी धुम ठोकली. वेदांतनगर पोलिसांनी पाठलाग करीत एका लुटारूला पकडण्यात यश मिळाले. या लुटारूच्या विरोधात गुन्हा नोंदवित अटक केल्याची माहिती निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली.
नासेर जमीर सैय्यद (२७, रा. गल्ली नं.११, रहेमानिया कॉलनी) असे पकडलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. निरीक्षक गिरी म्हणाले, ६ मेच्या मध्यरात्री १२.१३ वाजता ११२ डायलवर एका व्यक्तीला रेल्वेस्थानक परिसरात बेदम मारहाण करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आवघ्या काही मिनिटात गाडी पोहचली. तेव्हा अनिल विश्राम मेटकर (रा. बिल्दी, ता. पाचोरा, जि. जळगाव) या प्रवाशाला मारहाण करून लुटण्यात आल्याचे स्पष्ट झाले. प्रवाशाने सांगितलेल्या लुटारुंच्या वर्णनावरून त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा रस्त्यावर दोन तरुण दिसून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी धुम ठोकली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यात एकाला पकडण्यात आले. दुसरा पळून गेला. पकडलेल्या व्यक्तीला मारहाण झालेल्या प्रवाशासमोर उभे केले असता, त्याने ओळखले. त्यानंतर मेटकर यांच्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात लुटमारीचा गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक अनिल कंकाळ, उपनिरीक्षक शेषराव चव्हाण, अंमलदार जैस्वाल, गाडगे, गौर आणि धनवटे यांनी केले.
पकडलेला आरोपी अट्टल गुन्हेगारवेदांतनगर पोलिसांनी पाठलाग करून पकडलेला नासेर जमीर सैय्यद हा अट्टल गुन्हेगार आहेत.त्याच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आलेले असल्याची माहिती वेदांतनगर पोलिसांनी दिली.