छत्रपती संभाजीनगर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अतिक्रमणांसंदर्भाने बैठक घेण्यात आली, तर सिडको भागातील अतिक्रमणांचा अहवाल मागवण्यात आल्याची माहिती शपथपत्राद्वारे गुरुवारी महानगरपालिकेतर्फे न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्या खंडपीठास देण्यात आली. सिडकोत असलेल्या काही दुकानदारांनी पोटमाळे ( मॅझेनाईल फ्लोअर ) तयार केले आहेत अशांना नगरविकास कायद्यान्वये (एमआरटीपी-महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅनिंग ॲक्ट) नोटिसा बजावण्यात आल्याचेही खंडपीठास सांगण्यात आले.
सिडकोतील अतिक्रमणांसंदर्भात खंडपीठात जनहित याचिका दाखल आहे. त्यावरील सुनावणीवेळी मनपातर्फे दि. २३ जुलै रोजी झालेल्या बैठका व इतर प्रक्रियेविषयीची माहिती देण्यात आली. सुनावणीवेळी विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. प्रशांत अमृतकर उपस्थित होते. विद्यापीठात अतिक्रमणाबाबत कुलसचिवांच्या कक्षात बैठक घेण्यात आली. या बैठकीला बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मंगेश जगताप हजर होते. यानंतर दि. २ ऑगस्ट रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचा अहवाल कुलगुरूंच्या उच्चस्तरीय समितीकडे पाठविला जाईल.
खंडपीठातर्फे नियुक्त समितीच्या बैठकीला मात्र, पोलिस विभागाकडून कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. वाहतूक कोंडीवरील उपाययोजनेंतर्गत रस्त्यात लावण्यात येणारी वाहने पोलिस विभागाकडून हटविण्याबाबत सहकार्य अपेक्षित आहे, असेही खंडपीठाला शपथपत्रातून सांगण्यात आले. सिडकोतील अतिक्रमणाचा अहवाल मागवण्यात आल्याची माहिती मनपाने शपथपत्रानुसार सांगितली. खंडपीठ नियुक्त समितीच्या व विद्यापीठाच्या बैठकीला मनपा आयुक्त उपस्थित नसल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. पुढील सुनावणी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. मनपातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ संजीव देशपांडे, ॲड. अंजली बाजपेयी-दुबे, ॲड. संकेत जाधव, आयसी स्पायसीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. सपकाळ, न्यायालयीन मित्र अभय ओस्तवाल आदींनी सुनावणीवेळी काम पाहिले.