गंगापूर (औरंगाबाद) : अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील साखरेच्या पाकिटात वाळू मिश्रित माती आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार गंगापूर तालुक्यातील सिद्धपुर गावात समोर आला आहे. या प्रकारानंतर पालकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अंगणवाडी पर्यवेक्षकांनी वाळू मिश्रित साखरेचा संपूर्ण साठा परत केला आहे.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना पोषण आहार दिला जातो. याद्वारे ग्रामीण भागातील खास करून गरीब कुटुंबातील बालक कुपोषित राहू नये, त्याच प्रमाणे त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जातात. मात्र, अनेकदा बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या किंवा किडे सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून सिद्धपुर येथील अंगणवाडीमध्ये लाभार्थींना पोषण आहारातील साखरेची पाकिटे अंगणवाडी सेविका यांनी दिले. पाकिटे उघडल्यानंतर त्यात वाळू मिश्रित साखर आढळून आली.
पालकांनी या प्रकारानंतर अंगणवाडीत धाव घेतली. संतप्त पालकांच्या तक्रारीनंतर अंगणवाडी पर्यवेक्षकांनी पंचनामा करत अहवाल संबंधित प्रशासनाकडे पाठवला असून वाळू सापडलेल्या काही साखरेची पाकीट चाचणीसाठी देखील पाठवले आहेत. शिवाय लाभार्थ्यांना मार्फत वाटप झालेले साखरेचे सर्व पाकिटे व अंगणवाडीत असलेल्या इतर साखरेच्या पाकिटांचा साठा ठेकेदारा मार्फत परत पाठवण्यात आला आहे.
अशाने बालकांचे आरोग्य बिघडण्याचे काम होत आहे; शासनाने याची दखल घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी.- विलास जाधव, ग्राम पंचायत सदस्य सिद्धपुर
साठा परत घेण्यात आला असून ठेकेदाराला याबाबत कल्पना देण्यात आली आहे. तालुक्यातील इतर गावात असा काही प्रकार झाला आहे का हे पाहण्याच्या सूचना पर्यवेक्षकांना देण्यात आल्या आहे.-निलेश राठोड, बाल विकास अधिकारी गंगापूर