औरंगाबाद : शहरातील राष्ट्रीयीकृत, खाजगी बँकांच्या २९ एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आणलेले तब्बल १ कोटी १६ लाख ८० हजार २०० रुपये एटीमएममध्ये न भरताच भरल्याचा बनाव केला. अधिकृतपणे पैसे भरल्याच्या नोंदीही केल्या. कंपनीने केलेल्या ऑडिटमध्ये पैशाचा अपहार झाल्याचे उघडकीस आल्यामुळे सेवा पुरविणाऱ्या कंपनीने आठ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
आरोपींमध्ये योगेश पुंजाराम काजळकर, अनिल अशोक कांबळे, अमित विश्वनाथ गंगावणे (तिघेही रा. भीमनगर, भावसिंगपुरा), सचिन एकनाथ रंधे (रा. जटवाडा रोड, हर्सूल), अविनाश ज्ञानेश्वर पडूळ (रा. लाडसावंगी), सिद्धांत रमाकांत हिवराळे (रा. भीमपुरा,उस्मानुपरा) या कर्मचाऱ्यांसह कंपनीचे शाखा अधिकारी बाबासाहेब शामराव अंभुरे (रा. एन २, रामनगर, सिडको) आणि ऑडिटर संजय भालचंद्र जाधव (रा. वाळूज एमआयडीसी) यांचा समावेश आहे. सिडको पोलीस ठाण्यात सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड कंपनीचे उपशाखा अधिकारी रमेश साठे (रा. औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही कंपनी शहरातील विविध एटीएममध्ये बँकांकडून मिळालेल्या पैशाचा भरणा करते. या कंपनीकडे संबंधित बँकांच्या देशभरातील एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम आहे.
कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पुरुषोत्तम महेंद्रकर यांनी ५ मार्च रोजी ऑडिट केल्यानंतर त्यांनी २९ एटीएममध्ये १ कोटी १६ लाख ८० हजार २०० रुपये कमी असल्याचा अहवाल दिला. शहरात पैसे भरण्यासाठी कंपनीचे एकूण ७ रुट आहेत. प्रत्येक रुटच्या व्यवस्थापनासाठी २ एटीएम ऑफिसर, १ गनमन आणि चालक नेमलेले आहेत. अपहार झाल्याचे समोर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकाचवेळी सात रुटचे ऑडिट केले. तेव्हा रुट क्रमांक ४ वरील ७ एटीएममध्ये ३६ लाख ९१ हजार २०० रुपये, ६ क्रमांकाच्या रुटवरील १२ एटीएममध्ये ३८ लाख ८६ हजार ८०० रुपये आणि ७ क्रमांकाच्या रुटवरील १० एटीएममध्ये ४१ लाख २ हजार २०० रुपये कमी असल्याचे आढळून आले.
याविषयी संबंधित रूटवरील कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी कंपनीच्या शाखा अधिकाऱ्याच्या आदेशावरून एटीएममध्ये पैसे भरले नाहीत, असे स्पष्ट केले. तसेच एटीएममध्ये पैसे भरल्याचा अहवाल सर्वांनीच देत कंपनीची फसवणूक केली. त्यावरून वरील आरोपींच्या विरोधात सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविला. अधिक तपास सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड करीत आहेत.
असे भरतात ‘एटीएम’मध्ये पैसेसेवा देणारी कंपनी बँकांकडून कॅश भरण्याचा तपशीलवार तक्ता घेते. त्या शीटमध्ये नमूद कॅश बँकेतून विड्रॉल करून ती मनेज सर्व्हिस प्रोव्हायडरने (एमएसपी) दिलेल्या शीटमध्ये नमूद असलेल्याप्रमाणे त्या-त्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन मशीनमध्ये भरणा केला जातो. कॅश भरल्यानंतर रकमेचा लेखा-जोखा दररोज लोकेशन इन्चार्जकडे जमा होतो. इन्चार्ज त्याचा अहवाल कंपनीच्या मुख्य शाखेकडे पाठवतो. त्याविषयीचा अहवाल संबंधित एमएसपीलाही दिला जातो. सेवा देणारी कंपनी सर्व उपशाखांमधील एटीएमचे त्रैमासिक लेखा परीक्षण करते. ते मुख्य शाखेच्या लेखा परीक्षकाला पाठवतात. त्यानंतर वरिष्ठ स्तरावरून प्रत्येक एटीएममध्ये जाऊन पाहणी करून त्यावर कॅश भरणाऱ्या कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी घेतली जाते. त्यानंतर मशीनचा अहवाल मुख्य शाखेला पाठविला जातो. त्या अहवालात त्रुटी आढळल्यामुळे हा भांडाफोड झाला आहे.