सोयगाव (औरंगाबाद) : बैलाने शिंग मारल्यानंतर एका ऊसतोड मजुराच्या पोटातील आतडी बाहेर आली. यामुळे घाबरलेल्या मजुराने ती हाताने सावरत गावाकडे धाव घेतली. नागरिकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केल्याने या मजुराचा जीव वाचला आहे. ही घटना तालुक्यातील निंबायती येथे रविवारी घडली.
निंबायती येथील वसराम बाबू राठोड (वय ४५) हे ऊसतोडणी करून गावाकडे परत आले होते. रविवारी ते बैलजोडीला चारा-पाणी करीत असताना अचानक एका बैलाने त्यांच्या पोटात शिंग खुपसले त्यांना उचलून जमिनीवर आपटल्यामुळे त्यांची आतडी बाहेर आली. त्यांनी हाताने आतडी सावरून मदतीसाठी गावाकडे धाव घेतली. परिसरातील ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी बाहेर आलेला कोथळा आत ढकलून त्यांचे पोट घट्ट बांधले व तातडीने उपचारासाठी जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
शस्त्रक्रियेसाठी नाही पैसावसराम राठोड हे ऊसतोडीची कामे करतात. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. त्यात बैलाने गंभीर जखमी केल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रियेचा मोठा खर्च सांगितला असल्याने कुटुंबीय सैरभैर झाले आहेत. शासनाने कुटुंबियांना मदत करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.