औरंगाबाद : ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी पूर्वी मजुरांची मदत घेतली जात होती. २०१३ मध्ये मजुरांमार्फत हे काम करू नये, असा कायदा करण्यात आला. त्यामुळे महापालिकेने ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी हळूहळू अत्याधुनिक मशीन खरेदी केल्या. शहरात १०० टक्के चोकअपचे काम आता मशीनमार्फतच केले जाते. ड्रेनेजमध्ये गुदमरून मजुरांचा मृत्यू होण्याच्या घटना बंद झाल्या.
काही वर्षांपूर्वी ड्रेनेजचे शोषखड्डे रिकामे करण्यासाठी मजुरांच्या एका टीमला काम देण्यात येत होते. शहरात कुठेही ड्रेनेज चोकअप झाले तरी महापालिकेच्या किंवा खासगी कंत्राटदारांच्या मजुरांमार्फतच काम करण्यात येत असे. शासनाने २०१३ मध्ये कायदा अमलात आणल्यानंतर या प्रथा जवळपास बंद झाल्या. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून विविध मशीन खरेदी केल्या. हळूहळू या मशीनच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रत्येक झोनमध्ये या मशीन उपलब्ध असतात. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित मशीन पाठवून चोकअप काढण्यात येते. चोकअप काढताना पाईप काढणे, मैला ओढून घेण्यासाठी पाईपचा वापर करण्यासाठीच मजुरांचा वापर होतो.
गटार साफ करण्यासाठी कंत्राटशहरात छोटे-छोटे ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केले आहेत. ठरावीक कंत्राटदारच ही कामे करतात. मात्र, कामगार ड्रेनेजमध्ये अजिबात उतरत नाहीत. अनेकदा बद्दी मारून चोकअप काढण्यात येते.
कामगारांना साहित्य मिळतेमहापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा ग्लोज, बूट इ. साहित्य स्टोअर विभागाकडून देण्यात येते. अनेक कामगार याचा वापर करीत नाहीत.
वर्षातून एकदा आरोग्य तपासणीमहापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीत एखाद्या कर्मचाऱ्याला काही आजाराची लक्षणे दिसून आल्यास त्याला पुढील उपचारासाठी पाठविण्यात येते.