छत्रपती संभाजीनगर: निराला बाजार परिसरात महिला चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची थरारक घटना दुपारी दोन वाजता घडली. एका मोपेडला कारने समोरून जोरदार थडक दिल्याने मोपेडस्वार तरुण दूर फेकला गेला. त्यानंतर वेगवान अनियंत्रित कारने समोर पार्किंगमध्ये उभ्या ८ दुचाकींना धडक दिली. यामुळे त्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. तर यावेळी कार लागलीच थांबल्याने पार्किंगमधील देखील एक तरुण देखील थोडक्यात बचावला.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास नागेश्वरवाडी ते निराला बाजार रस्त्यावर एचडीएफसी बँकेच्याजवळ एक कार उभी होती. महिला चालकाने कार सुरू करताच त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. सरळ न जाता कार अचानक समोरच्या रस्त्याकडे वेगाने पुढे गेली. याचवेळी नागेश्वरवाडी कडे जाणाऱ्या मोपेडला बवेग कारने जोरदार धडक दिली. यामुळे मोपेड चालक तरुण दूर फेकला गेला. यानंतरही कार न थांबता वेगाने तशीच पुढे जात समोरील पार्किंगमध्ये घुसली. येथे सात ते आठ दुचाकी गाड्यांना कारने धडक दिली. यावेळी तिथे असलेला एक तरुण गाड्यांच्यामध्ये अडकून खाली पडला. मात्र, कार लागलीच थांबल्याने पुढील अनर्थ टळलला.
या अपघातात दोन तरुण थोडक्यात बचावले तर सात ते आठ दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. कार थांबल्यानंतर चालक महिला त्यातून उतरून पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली.