औरंगाबाद : शिकारीच्या मागे धावताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वर येण्याच्या अपयशी प्रयत्नात अखेर जीव गमवावा लागला. गुरुवारी चिकलठाणा शिवारातील महादेव मंदिरालगतच्या विहिरीत मृतावस्थेत बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली.
वन विभागाच्या बचाव पथकाने मृत बिबट्यास विहिरीबाहेर काढले. दुपारी दोनच्या सुमारास अशोकनगर परिसरातील शाळकरी मुले महादेव मंदिर परिसरात खेळत होती. चिंचा तोडण्यासाठी फिरताना विहिरीत मुले डोकावली. तेव्हा बिबट्या पाहून ती घाबरली, त्यांनी ही बाब आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगितली. सर्पमित्रालाही कळविले. संघानंद शिंदे यांनी वन विभागाला माहिती दिली.
रेस्क्यू टीम दाखल...वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर, सुशील नांदोडे तसेच रेस्क्यू टीमचे वनपाल घुसिंगे, एम. टी. कुमावत, वनरक्षक प्रकाश सूर्यवंशी, चोरमारे, मार्कंडे, चालक पी. एम. आहेरे घटनास्थळी दाखल झाले.
कुजल्याने दुर्गंधी...विहीर पडीक असल्याने त्याकडे कुणाचे लक्ष नव्हते, जीव वाचविण्यासाठी आटापिटा करून अखेर मदतीला कोणी न धावून आल्याने बिबट्या मेल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पाण्यावर त्याचा मृतदेह तरंगत होता, त्याची चामडी कुजून निघण्यास सुरुवात झाली होती; परंतु तो नेमका कधी पाण्यात पडला, त्याचे वय किती असावे, हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जाळी टाकून मृतदेह काढला..बिबट्याचे अवयव कुजल्याने पाण्यात पडू नये, त्यामुळे नेट पाण्यात टाकण्यात आली. रेस्क्यू टीममधील चालक पी. एम. आहेर यांनी विहिरीत पाण्यात उतरून तरंगलेल्या मृतदेहाखालून जाळी टाकली व पथकाने मृत बिबट बाहेर ओढला.
तर्क- वितर्क ...हा बिबट पळशी शिवारातील वनक्षेत्रातून आला आसावा. मादी असेल तर तिची पिल्ले देखील येथे असावीत, अशी भीती शेतकरी वर्गात होती. सिडको एन-१ परिसरात तीन वर्षांपूर्वी गजबजलेल्या वसाहतीत बिबट्या आला होता. हा देखील पळशी शिवारातूनच आला असावा, अशी चर्चा येथे जमलेल्या शेतकरी व नागरिकांत सुरू होती.