छत्रपती संभाजीनगर : रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रापासून ते जालना रोड, शिवाजीनगर, एन-४, एन-७, छावणी, पडेगाव, बायजीपुरा, पन्नालालनगर, सातारा- देवळाई परिसरासह २६ उपकेंद्रांवरील बत्ती गूल झाली होती.
जवळपास १ ते २ तासांनंतर वीजपुरवठा कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने सुरळीत सुरू करण्यात आला. वादळी वाऱ्याने विद्यानिकेतन कॉलनी येथे झाड पडल्याने खांब वाकले व विजेच्या तारा तुटल्या. जालना रोडवर बॅनर पडल्याने तारा तुटल्या, चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात नारळाचे झाड पडल्याने तारा तुटून नुकसान झाले.
सूतगिरणी, शिवाजीनगर, म्हाडा, रोशन गेट, पाॅवर हाउस, जाधववाडी परिसर यासह अनेक भागांतील ३३ केव्हीच्या उपकेंद्रांचा पुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. खबरदारी म्हणूनही काही केंद्राची वीज बंद करण्यात आलेली होती.
शहरात तासभर सुसाट वादळ, ५१.५ किमी प्रति तास वारा-एक ते दीडच्या दरम्यान शहरात सर्वाधिक ५१.५ ते ५२ किमी प्रतितास वेगाने वारे वाहिले.-अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात ८ ठिकाणी झाडांची पडझड झाली. यात सर्वप्रथम सातारा व रिध्दीसिध्दी हॉल जवळून कॉल प्राप्त झाला. यात कुठेही वित्त किंवा जीवितहानी झाली नाही.- बाजारपेठांमध्ये भाजीविक्रेत्यांचे पेंडॉल उद्ध्वस्त झाले. तर काही ठिकाणी बॅनर देखील फाडले.
असे का झाले ?एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्वत्र पूर्वमोसमी वारे सुरू झाले आहेत. सोबतच उत्तरेकडून येणारी ध्रुवीय वारेदेखील सक्रिय झाले. त्याचा परिणाम संपूर्ण राज्यावर झाल्याने वाऱ्याचा वेग वाढला. आज पाऊस पडायला हवा होता. ही परिस्थिती पाहता मान्सून उशिरा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.