छत्रपती संभाजीनगर : मागील ४५ वर्षांपासून सराफा व्यवसायात असलेल्या गौतम किशनलाल सेठिया (रा. नाजगल्ली) यांना ओळखीच्या दूध, तूप विक्रेत्याने सोन्याची माती देण्याच्या नावाखाली ३० लाख रुपयांचा गंडा घातला. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. विशेष म्हणजे याच विक्रेत्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना सोन्याची माती देऊन विश्वास जिंकला होता. पण, शुक्रवारी खरीच माती हाती टेकवून तो पसार झाला. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात रात्री अजय चौधरी व अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
के. के. सेठिया ज्वेलर्स नावाने सेठिया यांचा व्यवसाय आहे. हरयाणाचा चौधरी त्यांना व त्यांच्या नातेवाइकांना अनेक वर्षांपासून दूध व तूप विकत होता. २३ ऑगस्ट रोजी सकाळी चौधरी त्याच्या काकांसह त्यांच्या घरी गेला. आमच्याकडे सोन्याची माती असून, तुम्हाला कमी किमतीत देतो, असे आमिष दाखवले. सॅम्पल म्हणून आणलेली माती सेठिया यांनी सोन्याच्या भट्टीत तपासली असता त्यामध्ये सोने निघाले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. अशी ४ किलो माती त्याच्यासोबत आलेल्या पूनमसिंगकडे असून, शुक्रवारी आणून देतो, असे सांगून चौधरी निघून गेला. ६७ लाखांमध्ये चार किलो साेन्याच्या मातीचा त्यांच्यात व्यवहार ठरला.
ती तर होती खरोखरचीच मातीचौधरी, त्याचा काका व पूनमसिंग असे तिघेही शुक्रवारी दुपारी सेठिया यांच्या घरी पोहोचले. चहा, नाश्ता झाल्यावर त्यांनी चार किलो माती सेठिया यांच्याकडे सोपवली. दोन दिवसांपूर्वीच चाचपणी केल्याने सेठिया यांनी पुन्हा मातीची तपासणी केली नाही. चौधरीला २५ लाख रोख व १२ तोळे सोने देत उर्वरित पैसे नंतर देण्याचे कबूल केले. त्यानंतर रिक्षातून त्यांना मध्यवर्ती बस स्थानकावरही सोडले. घरी येऊन सेठिया यांनी सोन्याची माती सोने गाळण्याच्या भट्टीत टाकली असता माती पूर्ण जळून गेली आणि त्यांना धक्काच बसला. अवघ्या अर्ध्या तासात चौधरीचा मोबाइल संपर्क क्षेत्राच्या बाहेरही गेला होता. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची त्यांना जाणीव झाली.