औरंगाबाद : महाज्योती फेलोशिपसाठी कागदपत्रे पडताळणी झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांची ऑनलाइन स्क्रीनिंग करू. ती परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या सर्वांना पीएच. डी. संशोधनासाठी फेलोशिप देऊ. ‘महाज्योती’च्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी ३८८ कोटी खर्च येणार असून, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते पैसे द्यायला होकार दिल्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिफार्ट सभागृहात महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीतर्फे विद्यार्थी संवाद व इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा सत्कार सोहळा गुरुवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, डाॅ. प्रशांत अमृतकर, प्रवीण घुगे, डॉ. गजानन सानप, अध्यक्ष बळीराम जाधव यांची मंचावर उपस्थिती होती.
मंत्री सावे म्हणाले, राज्य शासन महाज्योतीमार्फत ३६ जिल्ह्यांत विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अशी ७२ वसतिगृहे सुरू करणार आहे. त्याचे ६० टक्के पैसे केंद्र शासन देणार आहे. ४० टक्के पैसे राज्य देणार असून, ३ वर्षात ही वसतिगृहे पूर्ण होतील. तसेच अर्धवट संशोधन सोडू नये म्हणून बॉण्ड किंवा अटींचा विचार सुरू आहे.डॉ. कालिदास भांगे, डॉ. टी. आर. पाटील, देवराज दराडे, महेंद्र मुंडे, विजय धनगर, विठ्ठल नागरे, आशिष लहासे, सोमनाथ चौरे, जयश्री भुस्कुटे आदींची उपस्थिती होती. धम्मपाल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. विद्यानंद वाघ यांनी आभार मानले.
‘आम्ही भारतीय लोकशाहीतील गोरबंजारा लोक’चे प्रकाशनसंशोधक विद्यार्थी बळीराम चव्हाण लिखित ‘आम्ही भारतीय लोकशाहीतील गोर बंजारा लोक’ या पुस्तकाचे प्रकाशन अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले.
या आहेत प्रमुख मागण्या- महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप सरसकट देण्यात यावी.- बार्टीप्रमाणे विद्यार्थ्यांना विद्यापीठ नोदणी दिनांकापासून अधिछात्रावृत्ती देण्यात यावी.- पीएच. डी. अधिछात्रावृत्ती प्रक्रिया पूर्ण करून सर्व पात्र संशोधक विद्यार्थ्यांना फेलाशिप अवॉर्ड लेटर तत्काळ देण्यात यावे.- तालुका व जिल्हास्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह हवे.