छत्रपती संभाजीनगर : सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने लेकरांना त्रास होईल, असे कोणतेही आंदोलन करायचे नाही. मराठा समाजाविरोधात रचले जात असलेले षडयंत्र समाजाने सात दिवस शांततेने पाहावे, अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी वेट ॲण्ड वॉचची भूमिका जाहीर केली. सात दिवसांनंतर आपण आंदोलनाची पुढील भूमिका जाहीर करू, असेही ते म्हणाले.
उपोषणामुळे प्रकृती खालावल्यामुळे चार दिवसांपासून शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जरांगे यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत आरक्षण पाहिजे. तसेच सगे-सोयऱ्याचा कायदा करावा, अशी मराठा समाजाची मागणी आहे. या मागणीसाठी राज्यकर्त्यांना बोललो तेव्हा मराठा समाजांच्या आमदार, मंत्री यांनी समाजाच्या बाजूने बोलणे आवश्यक होते. मात्र त्यांनी आपल्या नेत्यांची बाजू घेत माझ्याविरोधात एसआयटी लावण्याची आणि अटकेची मागणी केली. मराठा आमदार, खासदारांना समाजापेक्षा नेता आणि पक्ष मोठा वाटतो, हे सगळे मराठा समाज पाहत असल्याचे जरांगे म्हणाले. जेलमध्ये गेलो तरी तेथेही उपोषण करीन. समाजाने एकजूट आणि संयम ठेवून पाठीशी राहावे, असे आवाहन जरांगे यांनी केले.
प्रक्रिया सहा महिन्यांपासून सुरूचअंतरवाली सराटी येथील उपोषणकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. सहा महिने झाले तरी ही गुन्हे परत घेतले नाहीत. प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे मागे घ्यावीत आणि सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करावी, मराठा समाज तुमच्यासोबत असेल, असे जरांगे म्हणाले. कुणबी प्रमाणपत्र वाटप का थांबविले आणि कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याची मोहीम का बंद आहे, असा सवालही त्यांनी राज्य सरकारला केला.
४ रोजी सोलापूरच्या दौऱ्यावरशुक्रवारी दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यांनतर जरांगे अंतरवाली सराटीकडे रवाना झाले. ते ४ मार्च रोजी सोलापूर जिल्ह्यात जनसंवाद बैठकीला व ५ अणि ६ रोजी बीड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना हजर राहतील.
भजपा मादिक भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जरांगे यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांना संविधान भेट दिले. मराठा कार्यकर्ते सोशल मीडियावर भाजप महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात, अशी तक्रार त्यांनी जरांगे यांच्याकडे केली. जरांगे यांनी भाजपच्याच नव्हे तर कोणत्याही महिलेला शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला.