देवगाव रंगारी (औरंगाबाद): येथे गावात आलेल्या वानराच्या टोळीतील एका वानराच्या पोटाला मंगळवारी धारधार पत्रा लागल्याने प्रचंड रक्तस्राव होऊन पोटातील आतडे बाहेर आले. अशा गंभीर अवस्थेत बैचेन व सैरावैरा झालेल्या वानराला गावातील तरुण व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बारा तासांनी महत्प्रयासाने पकडून त्याचे प्राण वाचविले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
देवगाव रंगारीत अन्नपाण्याच्या शोधात आलेल्या वानरांच्या टोळीतील एका वानराच्या पोटाला मंगळवारी दुपारी १२ वाजता उडी मारताना धारदार पत्रा लागल्यामुळे रक्तस्त्राव होऊन त्याचे आतडे बाहेर आले होते. वेदनांनी विव्हळत सैरभैर झालेले वानर इकडे-तिकडे पळत होते, ही बाब गावातील भगवान वाघुळे, देविदास पोपळघट, रावसाहेब गोरे, पवन तुपे, बाळू ढगे, अजय सोनवणे, भारत गायकवाड, सोनू पोपळघट, आकाश उगले, सागर पोपळघट आदी तरुणांच्या लक्षात आली. त्यांनी पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र ते हाती लागत नव्हते.
या प्रयत्नात सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब गोरे यांना वानराच्या रोषाला सामोरे जावे लागले. ते हाती लागत नसल्याने वनविभागाला माहिती देण्यात आली. वनकर्मचारी भावलाल जाधव हे सहकाऱ्यांसोबत दाखल झाले. त्यांनी दुपारी तीनपासून संध्याकाळपर्यंत प्रयत्न केले; पण वानर काही केल्या हाती लागत नव्हते. शेवटी कन्नड वनविभागाो रेंजर साळुंके यांच्यासह प्रशिक्षित चार, पाच कर्मचारी पठाण, शेख, आव्हाड, नारायण ताठे, शंकर राठोड पिंजरा घेऊन दाखल झाले. यानंतरही चार ते पाच तास झटून रात्री बारा वाजता त्या वानराला पकडण्यात यश मिळाले.
पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचारगंभीर जखमी वानराला वनविभागाने ताब्यात घेतल्यानंतर त्याला विभागाच्या नर्सरीत ठेवण्यात आले आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर विजय थोरात, सर्जन डॉ. मालकर, बढे यांनी वानराच्या पोटाबाहेर आलेले आतडे शस्त्रक्रिया करून आत टाकल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत.