छत्रपती संभाजीनगर : धुणी-भांडी, फरशी पुसणे, झाडलोट ही कामे करायला लावून १३ वर्षीय मुलीला बापाने काड्यापेटीच्या काडीने गालावर चटके दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. मुलगी जिवाच्या आकांताने विव्हळल्यावर शेजारी जमा झाले. त्यांनी पोलिसांना बोलावले. जिन्सीतील संजयनगरात ही घटना घडली. या प्रकरणी वडिलांविरुद्ध ६ मार्चला गुन्हा दाखल झाला.
जिन्सीचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीची आई दुसरे लग्न करून निघून गेली. त्यामुळे मुलगी वडिलांसोबत राहते. सुरुवातीला ती आत्याच्या घरी राहिली. त्यानंतर वडिलांकडे आली. बाजूलाच तिची आजी राहते. वडील पायाने अपंग आहेत. आजीकडे जेवण करून ती वडिलांचाही डबा घेऊन येते. घरातील लहान-सहान कामे करते. ३ मार्चला रात्री किरकोळ कारणावरून वडिलांनी मुलीला मारहाण करून चटके दिले. त्यामुळे मुलगी विव्हळली. शेजारी जमा झाले. त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरून वडिलांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. आरोपी पसार झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक रावसाहेब काकड करीत आहेत.