औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. या पुतळ्याचे काम खुलताबाद येथील शतकुंडा आर्ट स्टुडिओत पूर्ण झाले आहे. पुतळा आज खुलताबाद येथून विद्यापीठ परिसरात आज आणण्यात येणार आहे.
शिल्पकार नरेंद्र सांळुके व स्वाती सांळुके या दाम्पत्याने हे शिल्प घडविले आहे. कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर पुतळा खुलताबाद येथील शतकुंडा आर्ट स्टुडिओतून विद्यापीठ परिसराकडे रवाना होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा ११ फुट उंच असून ब्रांझ धातुचा आहे. सुरुवातीला क्ले मॉडेलकरून कला संचालयानाची मान्यता घेतली आहे. या पुतळ्याच्या कामास सहा महिने लागले आहेत. यासाठी जवळपास ३५ लाख रुपयांचा निधी लागला.
दरम्यान, १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी विद्यापीठ परिसरात पुतळा उभारण्यात येणार असल्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर यासाठी चबुतरा तयार करण्यात आला आहे. लवकरच तारीख व वेळ निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.