छत्रपती संभाजीनगर: राज्य विधानसभा निवडणुक प्रक्रियेत आज ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील दोन उमेदवारांचे अर्ज मतदारसंघातील सूचकांची नावे नसल्याने छाननीत बाद ठरले. परिणामी त्यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर जावे लागले. उद्धवसेनेचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब गायकवाड यांची अपक्ष उमेदवारीचीची दोन अर्ज वैध ठरली. तर उद्धवसेनेचा उमेदवार म्हणून दाखल केलेल्या अन्य उमेदवारी अर्जासोबत त्यांनी पक्षाचा ए.बी.फॉर्म जोडला नसल्याने त्यांचा हा अर्ज बाद झाला.
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघात काल ३१ उमेदवारांनी ४७ अर्ज दाखल केले होते. पश्चिमचे निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या कार्यालयात आज बुधवारी उमेदवारांसमक्ष त्यांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत शेख अस्लम शेख महेबूब यांनी ऑल इंडिया मजलीस ए इन्क्लाब ए मिल्लत या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी उमेदवारी अर्जावर दहा सूचक मतदारांची नावे लिहिली नव्हती. यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरविण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी पारधी यांनी दिला. यासोबतच गोकुळ रंगनाथ लाड यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली होती. अर्ज छाननीप्रसंगी त्यांच्या उमेदवारी अर्जात दहा सूचकांची नावे होती. मात्र यातील काही सूचक हे पश्चिम मतदारसंघाबाहेरील असल्याने त्यांचा अर्ज रद्द करण्यात येत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहिर केले.
बाळासाहेब गायकवाड यांचा एक अर्ज बादपश्चिम मतदारसंघातील उद्धवसेनेचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब गायकवाड यांनी पश्चिम मध्ये तीन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात एक अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार म्हणून तर अन्य दोन्ही अपक्ष उमेदवार म्हणून दाखल केले होते. पक्षाने या मतदारसंघात राजू शिंदे यांना उमेदवारी दिल्याने गायकवाड यांना ए.बी. फॉर्म मिळू शकला नाही. यामुळे उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान त्यांचा उद्धवसेना पक्षाचा उमेदवार असलेला अर्ज बाद ठरविण्यात आला.