कन्नड : निसर्ग सौंदर्याची खाण असलेला ‘गौताळ्या’ने हिरवा शालू पांघरला असून येथील निसर्ग सौंदर्य चांगलेच बहरले आहे; परंतु वनविभागाने १५ सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे प्रवेश बंदी केल्याने निसर्गप्रेमींना हा अद्भुत नजरा पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
औरंगाबाद व जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर २६० चौ. किमी नैसर्गिक वृक्ष वनराईने नटलेले हे गौताळा अभयारण्य आहे. वेगवेगळ्या प्रजातींची झाडे, उंच उंच डोंगर, खोल दऱ्या, धबधबे, पशुपक्षी अशी वृक्षसंपदा आणि जीवसंपदा या अभयारण्यात आहे. हे जंगल पानगळीचे असल्याने उन्हाळ्यात अभयारण्य ओसाड पडते; मात्र पावसाळ्यात हे अभयारण्य म्हणजे निसर्गाने मुक्त हाताने केलेली सौंदर्याची उधळण वाटते. त्यामुळेच पर्यटकांचे पाय आपोआप या अभयारण्याकडे वळतात. तथापि हे निसर्ग सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करण्याच्या तसेच सेल्फी काढण्याच्या मोहात दुर्घटना घडण्याची शक्यता असते. तसेच अभयारण्यात जास्त प्रमाणात पाऊस पडून नाल्यांना पूर येत असतो. अशावेळी पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो, ही शक्यता गृहीत धरून १७ जुलै ते १५ सप्टेंबरपर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे, अशी माहिती वन्यजीव अधिकारी प्रवीण पारधी यांनी दिली.
गौताळ्याची सुरक्षा वाऱ्यावरदुसरीकडे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद असल्याचे सांगण्यात येत असले तरी हिवरखेडा तपासणी नाक्यावर मात्र ‘आओ जाओ घर तुम्हारा है’ अशी अवस्था असून या ठिकाणी कर्तव्यावर असलेले कर्मचारी त्यांच्या कर्तव्याच्या वेळेत दांड्या मारीत असल्याने गौताळ्याची सुरक्षा वाऱ्यावर आहे. परिणामी येथे अनधिकृतपणे पर्यटकांची रेलचेल पहावयास मिळत आहे.
पर्यटकांनी सहकार्य करावं १७ जुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत पर्यटकांना गौताळा अभयारण्यात प्रवेश दिला जाणार नाही. पर्यटकांनी यासाठी सहकार्य करावे.- प्रवीण पारधी, वन्यजीव रक्षक, कन्नड