- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : महापालिकेची निवडणूक कधी होईल, हे अद्याप निश्चित नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. भाजप, एमआयएम पक्षातील काही नेत्यांना गळ घालण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच त्यांचा मुंबईत जाहीर प्रवेश सोहळाही घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. आगामी मनपा निवडणूक पक्षाचे किमान २० नगरसेवक महापालिकेत निवडून यावेत, या दृष्टीने व्यूहरचना आखण्यात आली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष आहेत. सत्तेतील तिन्ही पक्षांनी एकमेकांचे नेते, कार्यकर्ते पळवू नयेत असे संकेत आहेत. याचे पालन स्थानिक पातळीवर कुठेही होत नसल्याचे दिसून येते. मालेगावमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला खिंडार पाडले. औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर येथील पाच काँग्रेस नगरसेवक, माजी उपनगराध्यक्षांनी राष्ट्रवादीत चार दिवसांपूर्वी प्रवेश केला. औरंगाबाद शहरात चित्र थोडेसे वेगळे आहे. राष्ट्रवादीचे निवडणुकीपूर्वी भाजप, एमआयएम या दोन पक्षांना खिंडार पाडण्याची रणनीती आखली. दोन्ही पक्षांतील काही माजी नगरसेवकांसोबत बैठका सुरू आहेत. भाजपमधील एका माजी नगरसेवकाच्या घरी तर राष्ट्रवादीने बैठक घेऊन विरोधी गटात खळबळ उडवून दिली. भविष्यात मनपात सत्ता स्थापन करायची असेल तर सेनेसोबत जाण्याचा विचार राष्ट्रवादी करीत आहे. काँग्रेसने सुरुवातीपासून ‘एकला चलो रे’ धोरण स्वीकारले आहे.
महापालिकेत राष्ट्रवादीचा वरचष्मा कधीच नव्हता. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत फक्त ३ जण पक्षाच्या चिन्हावर निवडून आले. पोटनिवडणुकीत एक जागा मिळाली. हे चारही नगरसेवक पक्षासोबत राहिले नाहीत. दोन जण तनवाणी यांच्या अपक्ष आघाडीत तर दोन जण काँग्रेस आघाडीसोबत गेले. अलीकडेच चार अपक्ष माजी नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्यानंतर एमआयएममधील दोन माजी नगरसेवकांना प्रवेश दिला होता. नंतर त्यांंना पक्षातून काढून टाकण्यात आले. आता पक्षातील नेते दुधामुळे पोळले असल्याने ताकही फुंकून पित आहेत. चारित्र्यवान आणि निवडून येऊ शकतील, अशाच माजी नगरसेवक, नगरसेविकांना प्रवेश देण्यात येणार आहे.
पक्ष वाढविण्याचा प्रत्येकाला अधिकारसर्वांना पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. आम्हीसुद्धा मागील काही दिवसांपासून पक्षवाढीसाठी प्रयत्न करतोय. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पक्षात येणाऱ्यांना सन्मानाने घेण्यात येईल. त्यादृष्टीने काही ठिकाणी बैठकांचे सत्र सुरू आहे. मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षबांधणी सुरू आहे.- खाजा शरफोद्दीन, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस