छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-१ येथे गजबजलेल्या उच्चभ्रू वसाहतीत जेव्हा बिबट्या शिकारीच्या शोधात आला होता. या घटनेनंतर दि. ९ डिसेंबर २०१९ रोजी वनविभागाच्या शीघ्रकृती दलाची स्थापना झाली. नंतर ही ‘आरआरयू टीम गेली कुठे’, असा सवाल उपस्थित होत आहे.
तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या दलाला जवळपास ४० लाखांचे अनुदान मिळवून दिले होते. त्यातून आधुनिक साधने वनविभागाला उपलब्ध करून दिली, वाहनही दिले. चमूला प्रशिक्षणही देण्यात आले. या चमूने संकटात सापडलेल्या अनेक प्राण्यांचा जीव वाचविला होता. पण, नंतर ही टीम गेली कुणीकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस व स्थानिक वनविभाग कर्मचारीच धावपळ करताना दिसतात.
चमू सक्रियच...
शीघ्रकृती दलाचे पथक कार्यरत असून, आणीबाणीच्या प्रसंगी ते तयार असतात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड, वैजापूर व इतर ठिकाणी सापडलेल्या बिबट्यांना पोलिस व नागरिकांनी उपचारासाठी दाखल केले हे खरे; पण इतर ठिकाणी दलाचे सदस्य सक्रिय असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर म्हणाले.