छत्रपती संभाजीनगर : शहराचे सरकार म्हणजे महापालिका होय. या सरकारची प्रशासकीय इमारत तोकडी पडत असल्याने लवकरच मजनू हिलच्या उंच टेकडीवर १६ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. या ठिकाणावरून अर्ध्याहून अधिक शहर दिसते. समोर नयनरम्य असा सलीम अली सरोवर असून, कामासाठी ही जागा उत्तम असून, याच ठिकाणी इमारत उभी राहील. इमारतीच्या लोकार्पणापर्यंत मी येथेच राहणार असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.
महापालिकेचे तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहानूरमियाँ दर्गा परिसरातील भाजी बाजाराची जागा प्रशासकीय इमारत बांधायची म्हणून बीओटीच्या विकासकाकडून परत घेतली. विकासकाला कोट्यवधी रुपये देण्यात आले. त्यानंतर त्यांची बदली झाली. जी. श्रीकांत यांनी आपल्या पद्धतीने प्रशासकीय इमारतीसाठी जागेचा शोध सुरू केला. त्यांना दर्गा चौकातील जागा आवडली नाही. मजनूहिल परिसरात मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्राच्या बाजूला असेलेली जागा त्यांना पसंत पडली. नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ही जागा चांगली असून, त्यासाठी अधिकाऱ्यांची समिती गठित केली असून प्रकल्प सल्लागार समितीही नियुक्त करण्याचे आदेशदेखील त्यांनी दिले.
मजनूहिल येथे रोझ गार्डन असून, त्याला हात न लावता नवीन प्रशासकीय इमारत किमान १६ मजली उभारण्याचा विचार आहे. ही इमारत अत्याधुनिक सोयी- सुविधांनी परिपूर्ण असेल. या इमारतीवरून संपूर्ण शहरावर नजर ठेवता येईल. येथून जवळच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त कार्यालय असल्यामुळे या कार्यालयाशी कनेक्टिव्हिटी राहील, असेही प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.
आराखड्यात गार्डनचे आरक्षणविकास आराखड्यात मजनू हिलच्या टेकडीवर उद्यान तयार करता येऊ शकते. नवीन विकास आराखड्यात प्रशासकीय इमारतीला जेवढी जागा लागणार आहे, तेवढी जागा उपलब्ध करून घेण्यात येणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. भूमिपूजन आपल्या हस्ते होईल का, या प्रश्नावर जी. श्रीकांत यांनी सांगितले की, लोकार्पण होईपर्यंत मी येथेच राहणार आहे.