छत्रपती संभाजीनगर : सोयगांव तहसीलसाठी नवीन चारचाकी प्रशासनाने दिल्यानंतर तहसीलदाराच्या पोरानेच ती चारचाकी पळवून मजा मारली. दहा दिवसांपासून तहसीलदार यांनी ती चारचाकी कुशन, सीटकव्हर टाकण्यासाठी हर्सूल येथील निवासस्थानीच ठेवली. अद्याप त्या वाहनाची पासिंगही झालेली नाही. असे असताना तहसीलदार मोहनलाल हरणे यांचा मुलगा गौरवकुमार व त्याच्या मित्रांनी ते वाहन वापरले. कनॉट परिसरात पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी पांढऱ्या रंगाची बोलेरो सायरन वाजवून पळवित असताना पकडली. तहसीलदारांची जीप आहे, असे उत्तर गौरवकुमार व त्याचे मित्र मानव बंब, अभिजीत ताठे यांनी पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी वाहन जप्त करून पोलिस ठाण्यात जमा केले. शासकीय वाहनांचा अशाप्रकारे गैरवापर केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तहसीलदार हरणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
१५ ऑगस्टपासून आजवर ते वाहन विना लॉगबुक आणि विना पासिंग कुठे फिरविण्यात आले, याबाबत प्रशासन माहिती घेणार आहे.ज्या तहसीलमध्ये वाहने नाहीत, त्यांना जिल्हा प्रशासनाने स्वातंत्र्यदिनी नवीन वाहने दिली. त्यात साेयगावच्या तहसीलसाठी नवीन बोलेरो चारचाकी देण्यात आली. त्या वाहनाचे पासिंगही झालेले नव्हते. सोयगांव तहसीलऐवजी ती चारचाकी शहरातच हरणे यांच्या निवासस्थानी होती.
शासकीय वाहनाचा गैरवापर का केला, वाहन तहसील कार्यालयासाठी असतांना कुटुंबीयांनी का वापरले. १५ ते २३ ऑगस्टपर्यंत वाहन कुठे ठेवले होते. आदी प्रश्न प्रशासनाने केले आहेत. तहसीलदार हरणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विधाते यांनी दिली.
कुणाला दिली नवीन वाहने....सिल्लोड, पैठण, सोयगांव तहसीलदारांसह छत्रपती संभाजीनगर उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रत्येकी एक बोलेरो जीप १५ ऑगस्टला देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीतून ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत.
दोन महिन्यांपूर्वीच पदोन्नती...तहसीलदार मोहनलाल हरणे यांना दोन महिन्यांपूर्वीच पदोन्नती मिळाली आहे. ते राजशिष्टाचार विभागात नायब तहसीलदार होते. पदोन्नतीनंतर त्यांची सोयगांव तहसीलदारपदी बदली करण्यात आली. दरम्यान, हरणे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, माझ्याकडे तहसीलदार व मुख्याधिकारी पदाचाही पदभार असल्याने मी सोयगांवलाच आहे. कुशनच्या कामानिमित्त वाहन घरी ठेवले होते.