वाळूज महानगर : एनआरबी कंपनी ते राजयोग हॉटेल दरम्यान मुख्य मार्गावर गुरूवारी सकाळी ऑइल गळती झाल्याने रस्त्याची घसरगुंडी झाली. यामुळे कंपनीतून ये-जा करणारे ८ ते १० दुचाकीस्वार वाहन घसरून पडले. त्यात तिघे गंभीर तर इतर किरकोळ जखमी झाले. माहिती मिळताच एमआयडीसीच्या अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता वाहतूकीसाठी सुरळीत करून दिला.
औद्योगिक परिसरातील एनआरबी चौकात ५ डिसेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या एक टँकरमधून अचानक ऑइल गळतीला सुरूवात झाली. त्यानंतर तो टँकर एनआरबी कॉर्नरपासून पुढे तिसगावच्या दिशेने सुसाट वेगाने निघून गेला. ज्या मार्गावर ऑइल सांडले होते, त्याच मार्गाने औद्योगिक परिसरात ये-जा करण्यासाठी अनेक वाहनधारक वापर करतात. ऑइल सांडल्याने रस्ता गुळगुळीत होऊन घसरगुंडी सारखा निसरडा झाला होता. याचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकी चालक नियंत्रण सुटून रस्त्यावर पडले.
साडेनऊ वाजेच्या सुमारास एनआरबी कॉर्नर हून पुढे शहराच्या दिशेने जाण्यासाठी निघालेले कल्याण मुळे (५६, रा.जोगेश्वरी) हे दुचाकीसह घसरून रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ मुलगा राहूल मुळे याने खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मुळे यांच्यासह इतर ही दोघे गंभीर जखमी झाले. त्यात एका महिलेचा समावेश असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी कामगारांनी लोकमतशी बोलताना दिली.
अग्निशमन तात्काळ दाखलऑइलमुळे दुचाकीस्वार वाहनांचा तोल जावून वाहनचालक वाहनासह रस्त्यावर घसरून पडत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी अवघ्या दहा मिनीटांत घटनास्थळी धाव घेतली. जोरदार पाण्याचा मारा करून रस्ता स्वच्छ केला. यासाठी अग्निशमन विभागाचे सारंग वासनीक, ललीत ब्राम्हणकर, एसके गायककवाड, नितीन पारखे यांनी प्रयत्न केले.