वाळूज महानगर : रांजणगावच्या कपिल सुदाम पिंगळे या तरुणाच्या खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त धनंजय पाटील हे तपास करणार आहेत. या प्रकरणात ‘सुपारी’ देणाऱ्या मास्टरमाइंडचा शोध लावण्याचे आव्हान गुन्हे शाखेसमोर आहे.
कपिलचा १८ जुलै रोजी जयेश उर्फ यश संजय फत्तेलष्कर (२४, रा. बेगमपुरा) या त्याच्या मित्रानेच आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने गावठी कट्ट्याने गोळी झाडून व चाकूचे वार करून खून केला होता. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी यश व त्याचे साथीदार भरत किसन पंडुरे (३३, रा. बेगमपुरा), विकास सुरेश जाधव (१८) व सागर उर्फ जितसिंग विलास मुळे (२३, दोघेही रा. जालना) यांना जालना येथे पकडले होते. तपासात कपिललाच कुणी तरी यशला जिवे मारण्याची सुपारी दिल्याचे पोलिसांना समजले. मित्र असलेल्या कपिलने आपल्याला मारण्याची सुपारी घेतल्याच्या संशयावरून यशनेच कपिलला संपविण्याचा कट रचला. यशने तीन साथीदारांच्या मदतीने कपिलला संपवले. हा खून करण्यासाठी यशने जालना येथील अमर उर्फ अतुल गणेश पवार याच्याकडून ५० हजारांत गावठी कट्टा विकत घेतल्याची माहिती आरोपींनी दिल्याने अमरच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या.
आतापर्यंत ५ आरोपी जेरबंदकपिल खून प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी आतापर्यंत ५ आरोपींना जेरबंद केले असून त्यांची कसून चौकशी केली आहे. आता गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील पुढील तपास करणार आहेत. या तपासात मृत कपिल यास यशचा खून करण्याची सुपारी देणारा ‘मास्टरमाइंड’ कोण याचा शोध लागणार का, याकडे वाळूज महानगरवासीयांचे लक्ष लागले आहे.