फुलंब्री ( छत्रपती संभाजीनगर) : मराठा आरक्षण विषयी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी संदर्भात विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ठ करावी. त्यांनी समाजाची दिशाभूल करू नये, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज केली. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती १८० जागा जिंकणार असा दावा देखील दानवे यांनी केला. ते फुलंब्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. फुलंब्री येथे शनिवारी सभापती अनुराधा चव्हाण यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी रावसाहेब दानवे आले होते. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. विरोधी पक्षातील नेते मराठा समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत दानवे यांनी केला. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला आपला पाठींबा आहे का हे विरोधी पक्षांनी मिडिया समोर येऊन सांगावे. शरद पवार,उद्धव ठाकरे ,नाना पाटोळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आम्ही आरक्षण देण्यासाठी तयार आहोत, पण हे आरक्षण दुसऱ्यावर अन्याय करून द्यावे अशी आमची भूमिका नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशी चर्चा आहे, असा प्रश्न विचारला असता पक्ष काहीही करू शकते असे उत्तर दानवे यांनी दिले. तर मराठा चेहरा म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पक्ष देऊ शकतो का ? असी विचारणा केली असता त्यांनी मुख्यमंत्रीपद रिकामे नाही, असे सांगून दानवे यांनी अधिक बोलणे टाळले. दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती १८० जागा जिंकणार असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. तसेच पक्षाने जर सरपंच पदाची निवडणूक लढविण्याचे आदेश दिले तर ती निवडणूक लढवेन. पक्षाचा आदेश अंतिम राहील. असेही दानवे यांनी सांगितले. मात्र, मी विधानसभा निवडणूक लढणार नाही, हे मी या अगोदर स्पष्ट केले आहे, अशी भूमिकाही दानवे यांनी स्पष्ट केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट, सभापती अनुराधा चव्हाण, विजय औताडे, शिवाजीराव पाथ्रीकर, मंगलबाई वाहेगावकर, ऐश्वर्या गाडेकर, योगेश मिसाळ, जितेंद्र जैस्वाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थिती होते.