छत्रपती संभाजीनगर : रखडलेला पैठण- पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग (क्र. ७५२) ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावा, तसेच सर्व संबंधित खात्यांनी काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी दिले.
पैठण पंढरपूर पालखी मार्ग २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला. यानंतर निविदा काढल्यानंतर काम सुरू करण्यात आले होते. हा राष्ट्रीय महामार्ग पैठण मुंगी, बोधेगाव, घोणसपारगाव, उखंडाचकला, बीड, सांगवी, शिरूर कासार, राक्षस भुवन, खोल्याचीवाडी, कारेगाव, डोंगरकिन्ही, चुंबळी, पाटोदा, पारगाव घुमरा, दिघोळला जोडला जाऊन पुढे तो खर्डा मार्गे पंढरपूरकडे जाणार आहे.
सुमारे ७ वर्षांपूर्वी या महामार्गाचे काम सुरू झाले. मात्र, अनेक ठिकाणी या मार्गाचे काम अपूर्ण आहे. मुख्यत: पैठण येथून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना पैठण- पंढरपूर मार्गामुळे वारी करणे अत्यंत सुखकर होणार आहे. गेल्या सात वर्षांमध्ये वेगवेगळ्या कारणाने आणि संबंधित ठेकेदार, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता प्रलंबित आहे. यासंदर्भामध्ये पाटोदा येथील नागरिक महादेव नाना नागरगोजे तसेच रामकृष्ण गणपत रंधवे, चक्रपाणी लक्ष्मण जाधव यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी बीड, सहायक अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग माजलगाव यांना वारंवार निवेदने दिले होते.
नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन व मोर्चे काढण्यात आली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ऑगस्ट २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांना दिले होते; परंतु अद्यापही पालखी मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे वरिल तिघांनी औरंगाबाद खंडपीठांमध्ये ॲड. नरसिंह जाधव यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी गुरुवारी झाली. यावेळी प्रतिवादी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, बांधकाम विभाग पदमपुरा औरंगाबाद व उपविभागीय अभियंता माजलगाव यांच्या शपथपत्राची नोंद घेऊन पैठण पंढरपूर पालखी महामार्ग ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करावा, तसेच सर्व संबंधित खात्यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आदेश देत याचिका निकाली काढली. ॲड. जाधव यांना ॲड. राकेश ब्राह्मणकर यांनी सहकार्य केले.