औरंगाबाद : आई-वडिल शेतात कापूस वेचीत असताना तीन वर्षांची चिमुकली झाडाखाली खेळत होती. तेव्हा अचानक आलेल्या कोल्ह्याने चिमुकलीच्या डोक्यासह हाताचा लचका तोडून पळ काढला. या चिमुकलीवर महिनाभरापासून उपचार करण्यात येत होते. उपचार सुरू असतानाच सोमवारी सकाळी ९ वाजता तिचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ही घटना १ डिसेंबर रोजी कन्नड तालुक्यातील आडगांव (जे) शिवारात घडली. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
धम्मपरी समाधान सोनवणे (३, रा. आडगांव, जा. कन्नड) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. चिमुकलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार धम्मपरीचे आई वडिल १ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता स्वत:च्या शेतात कापूस वेचित होते. तेव्हा धम्मपरी बांधावरील झाडाखाली खेळत होती. त्याचवेळी अचानकपणे आलेल्या कोल्ह्याने तिच्या डोक्याचा मोठा लचका तोडला. त्याचवेळी तिच्या उजव्या हातालाही चावा घेतला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धम्मपरीला सुरुवातीला ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला घाटी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तिच्या उपचार सुरू असतानाच सोमवारी सकाळी ९ वाजता तिची प्राणज्योत मालवली. तिच्या पश्चात आई, वडिल, दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
वन विभाग आचंबितकोल्ह्याने चावा घेतल्यानंतर एखाद्याचा मृत्यू झाल्याची घटना पहिल्यांदाच घडल्यामुळे वनविभागही आचंबित झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यापासून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बालिकेच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत. बालिकेचा घाटीत मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वनपाल सी.एम. महाजन यांनी घाटी रूग्णालयात धाव घेतली. त्याठिकाणी डॉक्टरांची भेट घेऊन चौकशीही केली. या प्रकरणात डॉक्टरांचे अहवाल आल्यानंतर मृताच्या कुटुंबियांना शासनाच्या नियमाप्रमाणे मदत केली जाईल, असेही महाजन यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.