छत्रपती संभाजीनगर : शहरातील सर्वात मोठी स्मशानभूमी म्हणजे कैलासनगर होय. या ठिकाणी दररोज किमान ४ ते १० जणांवर अंतिम संस्कार करण्यात येतात. स्मशानभूमीसमोर स्मार्ट सिटीमार्फत रस्ता तयार करण्यात येतोय. त्यासाठी जागोजागी मोठ्या प्रमाणात खोदकाम करून ठेवण्यात आले. दुचाकी वाहनही येथून व्यवस्थित ये-जा करू शकत नाही. मृतदेह नेण्यासाठी नातेवाईक, स्वर्गरथ चालकाला अक्षरश: मरणयातनाच सहन कराव्या लागत आहेत. काम त्वरित सुरू न केल्यास या भागातील नागरिकांना रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.
३१७ कोटी रुपये खर्च करून शहरातील रस्ते स्मार्ट सिटीकडून गुळगुळीत करण्यात येत आहेत. जवळपास ४० पेक्षा अधिक रस्त्यांचे काम झाल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात येतोय. काही ठिकाणी कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे उघड झाल्यावर तेवढा रस्ता खोदून परत काम करावे लागले. स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराने प्रत्येक रस्त्याच्या कामात नवीन वाद जन्माला घातला आहे. त्यामुळे नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढू लागला. लक्ष्मण चावडी ते कैलासगनर स्मशानभूमी हा रस्ता विकास आराखड्यानुसार ८० फूट रुंद आहे. रस्त्यावर अतिक्रमणे होती. अतिक्रमणे काढण्यासाठी मनपाकडून बरीच दिरंगाई करण्यात आली. त्यामुळे रस्त्याचे काम थांबले. काही अतिक्रमणे काढली,काही तशीच सोडून दिली. गोरगरिबांच्या अतिक्रमणांवर कारवाई केल्याची तक्रार आहे. सिमेंट रस्त्यासाठी कंत्राटदाराने खोदकाम करून ठेवले. एक महिन्यापासून काम बंद आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना ये-जा करताना बराच त्रास सहन करावा लागतोय. मृतदेह नेताना खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले.
रास्ता रोको करावा लागेलड्रेनेजचे पाणी २४ तास रस्त्यावरून वाहत आहे. या पाण्यातून ये-जा करणे शक्य होत नाही. दुचाकीधारकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. रास्ता रोकोशिवाय आमच्याकडे आता पर्याय उरला नाही.-रवी कदम, सामाजिक कार्यकर्ते.
ड्रेनेजचा प्रश्न सोडवलारस्ता करण्यापूर्वी ड्रेनेज लाईन करा, अशी नागरिकांची मागणी होती. स्मार्ट सिटी ड्रेनेजचे काम करीत नाही. मंगळवारी बऱ्याच परिश्रमानंतर ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लागला आहे. रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल. सध्या नागरिकांना त्रास होतोय, हे खरे आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.-सौरभ जोशी, अतिरिक्त आयुक्त, मनपा.