- योगेश पायघनऔरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनुदानित ४४ महाविद्यालयांत १८४ पदे भरण्यासाठी मंजुरी मिळाली. मात्र, रखडलेल्या प्राध्यापक, प्राचार्य भरतीसाठी गेल्या सहा महिन्यांत केवळ ३ संस्थांना ३८ पदे भरण्यास ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले असून त्यापैकी केवळ २ जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने भरती प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. रेंगाळलेल्या भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने दिलेल्या ३१ ऑक्टोबरच्या डेडलाईनचे काय झाले, असा सवालही अर्हताप्राप्त उमेदवार करत आहेत. भरतीतील ‘अर्था’चे ‘गणित’ बिघडल्याचीही चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
राज्यात १ ऑक्टोबर २०१७ रोजी रिक्त पदांनुसार राज्यात २ हजार पदे भरण्यास शासनाने १२ नोव्हेंबर २०२१ रोजी मान्यता दिली. त्यानुसार, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात सहायक प्राध्यापकांच्या १८४ रिक्त पदांचा समावेश आहे. उच्च शिक्षण विभागाने २१ जुलैनंतर सातत्याने प्राचार्य, सहसंचालक, विद्यापीठाचे संबंधित अधिकारी यांच्या बैठका घेतल्या. बिंदूनामावलीची प्रक्रिया पूर्ण करावी व ‘ऑनलाइन’ ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र, संस्थाचालकांनी जुमानले नाही.
उच्च शिक्षण प्रधान सचिवांनी विद्यापीठनिहाय आढावा बैठक घेत रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचनाही केल्या. मात्र, तरीही महाविद्यालये जुमानत नसल्याने अखेर उच्च शिक्षण संचालकांनी १२ ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढून मंजूर पदे असलेल्या महाविद्यालयांना ३१ ऑक्टोबरपर्यंत ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र घेण्यासाठी मुदत दिली. अन्यथा पदे इतर संस्थांना वर्ग करण्याचा इशारा दिला. तरीही संस्थाचालकांनी जुमानले नाही. अनेक संस्थांचे प्रस्ताव मावक, रोस्टर, विद्यापीठ, उच्च शिक्षण विभागाच्या फेऱ्यात अडकले असल्याने भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह आहे.
आचारसंहितेनंतर गतीमहाविद्यालयांना ३१ ऑक्टोबरपर्यंत ना-हरकत प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. महाविद्यालयांनी मंजूर पदे भरण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्याचे वारंवार आवाहन करत आहोत. आतापर्यंत राजूर येथील संस्थेच्या ४, भूम येथील संस्थेच्या १७ पदांची जाहिरात निघाली आहे. जालना येथील संस्थेस १७ पदांची एनओसी मिळाली आहे. शिक्षक मतदार संघ निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यानंतर भरती प्रक्रियेला गती येईल.- डाॅ. एस. एम. देशपांडे, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, औरंगाबाद
जिल्हानिहाय अनुदानित महाविद्यालयेऔरंगाबाद - ३९बीड - ४०जालना - १४उस्मानाबाद - २२